मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनाने मालमत्ता करवसुलीचे उद्दीष्ट्य पूर्ण करण्यासाठी थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. महापालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्या तीन मालमत्ताधारकांवर जप्ती आणि अटकावणीची कारवाई केली. या कारवाईत पी-उत्तर विभाग कार्यालयाच्या हद्दीतील मालाडमधील कला विद्या मंदिर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी या शैक्षणिक संस्थेचे संगणक केंद्र जप्त करण्यात आले. तर वडाळा येथील न्यू नॅशनल मार्केटचे दोन व्यावसायिक गाळे आणि पवई येथील चारभुजा मार्बल आर्ट या दुकानाचा समावेश आहे. या तीनही मालमत्ताधारकांकडे एकूण ०४ कोटी १३ लाख ८८ हजार ५७७ रुपयांची कर थकबाकी आहे.

मुंबईकरांना गेल्या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची देयके वितरित करण्यास उशीर झाल्यामुळे यंदा मालमत्ता कर वसुली करताना पालिकेच्या नाकीनऊ आले आहेत. करभरणा करण्यासाठी यंदा ३१ मार्चऐवजी २५ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी करनिर्धारण आणि संकलन खात्याने विविध उपाययोजना केल्या आहेत. कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी करनिर्धारण आणि संकलन विभागाने अतिशय सुक्ष्म पद्धतीने नियोजन केले आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या करधारकांकडेही करनिर्धारण विभागाने पाठपुरावा सुरू केला आहे. सातत्याने आवाहन, तसेच वारंवार पाठपुरावा करूनही मालमत्ता कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांवर पालिकेने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा…आशा सेविका चार महिने मानधनापासून वंचित

महानगरपालिकेने मंगळवारी मुंबईतील तीन मालमत्तांवर जप्ती व अटकावणीची कारवाई केली. मुंबई महानगरपालिका अधिनियम-१८८८ च्या कलम २०५ नुसार, जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. मालाड येथील कला विद्या मंदिर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजीकडे तीन कोटी २८ लाख रुपये मालमत्ता कर थकीत आहे. या शैक्षणिक संस्थेतील संगणक केंद्र जप्त करून अटकावणीची कारवाई करण्यात आली. वडाळा येथील रफी अहमद किडवाई मार्गावरील न्यू नॅशनल मार्केटकडे ५९ लाख ८८ हजार ५७० रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे, या मार्केटमधील दोन व्यावसायिक गाळ्यांवर जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली. पवई येथील चारभुजा मार्बल आर्ट या मालमत्तेचा २६ लाख रुपये कर थकीत आहे. त्यामुळे, या मालमत्तेवर जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली. दरम्यान, जप्ती आणि अटकावणीची कारवाई झालेल्या या मालमत्ताधारकांनी पुढील पाच दिवसांच्या आत करभरणा न केल्यास जप्त केलेल्या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.