मुंबई : अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पूल, विक्रोळी पूल, कर्नाक पूल या रेल्वे रूळांवरील उड्डाणपुलांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून ते वाहतुकीस खुले करण्याचे उद्दीष्ट मुंबई महानगरपालिकेने ठेवले आहे. तर मुंबई सेंट्रल येथील बेलासिस पुलाचे काम करण्यासाठीचा कंत्राट कालावधी एप्रिल २०२६ पर्यंत आहे. मात्र, बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करून डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. शीव उड्डाणपूलालाही ३१ मे २०२६ ची मुदत देण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल खात्यामार्फत मुंबई महानगरात विविध ठिकाणी पूल बांधणीची कामे सुरू आहेत. यात प्रामुख्याने गोपाळकृष्ण गोखले पूल, शीव (सायन) पूल, बेलासिस पूल, कर्नाक पूल, विद्याविहार पूल आणि विक्रोळी पूल आदींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर आणि सहपोलिस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी सोमवारी पालिका मुख्यालयात एका संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. महानगरपालिका, रेल्वे, पोलिस आणि बृहन्मुंबई विद्याुत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. विविध पुलांची उभारणी करताना महापालिका, रेल्वे, पोलीस, ‘बेस्ट’ यांच्यात समन्वय व सुसंवाद असावा. प्रलंबित बाबी समन्वयाने सोडवाव्यात. त्यासाठी, कालमर्यादा निश्चित कराव्यात. बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करण्याकामी प्रयत्नशील राहावे, असे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बांगर यांनी यावेळी दिले.

बेलासिस पुलाचे काम करण्यासाठीचा कंत्राट कालावधी एप्रिल २०२६ पर्यंत आहे. मात्र, पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करून डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आदेश बांगर यांनी दिले. पूल बांधकामास अडथळा ठरणारी १२ बांधकामे हटवली आहेत. उर्वरित १२ बांधकामे महिनाभरात हटवावीत व व्यावसायिकांचे पुनर्वसन ुयोग्य ठिकाणी करावे, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

शीव उड्डाणपुलाचे काम रखडले

● मध्य रेल्वेवरील शीव उड्डाणपूलाचे काम गेल्या काही दिवसांपासून रखडले आहे.

● त्याचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. पूल पाडण्याची कार्यवाही प्रलंबित आहे.

● प्रलंबित बाबी रेल्वे आणि महानगरपालिकेने समन्वयाने सोडविल्या पाहिजेत. शीव पुलाचे बांधकाम निश्चित कालावधीत पूर्ण होण्यासाठी योग्य नियोजन करून विविध कामांसाठी कालमर्यादा आखावी.

● शीव रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिम बाजूकडील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी पालिकेच्या विविध खात्यांनी एकत्रितपणे कार्यवाही करावी.

● पादचारी पूल बांधणीत अडथळा ठरणारी बांधकामे हटवणे, सांडपाणी वाहिन्या बंद करणे, सार्वजनिक प्रसाधनगृहाचे निष्कासन, ‘बेस्ट’ वाहिन्यांचे स्थलांतरण वेगाने पूर्ण करा, असे आदेशही बांगर यांनी यावेळी दिले.

कोणत्या पुलाला कोणती मुदत ?

● अंधेरी पूर्व – पश्चिमेला जोडणारा गोपाळकृष्ण गोखले पूल – ३० एप्रिल २०२५

● कर्नाक रेल्वे उड्डाणपूल – १० जून २०२५

● बेलासिस पूल – डिसेंबर २०२५ ● शीव उड्डाणपूल – ३१ मे २०२६

Story img Loader