मुंबई : मुंबईतील हवेचा स्तर वाईट झाला असून बोरिवली पूर्व व भायखळा परिसरातील हवेचा स्तर सातत्याने ‘अतिवाईट’ असल्यामुळे या दोन्ही भागांतील सर्व बांधकामे बंद करण्यात येणार आहेत. या परिसरातील खासगी आणि सार्वजनिक स्वरूपाची सर्व बांधकामे सुरक्षित पातळीवर आणून बंद करण्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आली आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबतची घोषणा केली. प्रदूषण नियंत्रणाच्या नियमावलीचे बांधकामांच्या ठिकाणी योग्य पालन होत नसल्यामुळे या विभागातील सरसकट सर्व बांधकामे बंद करण्याचा कठोर निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा स्तर बिघडू लागला आहे. या पार्श्वभूमीवर भूषण गगराणी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनाची माहिती गगराणी यांनी यावेळी दिली. बोरिवली आणि भायखळा परिसरातील हवेचा स्तर सातत्याने खालावला असल्यामुळे या दोन्ही भागांतील सर्व प्रकारची बांधकामे थांबण्यात येत असल्याची घोषणा आयुक्तांनी यावेळी केली. यावेळी पालिका आयुक्तांसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे उपस्थित होते.
हेही वाचा >>> मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर सरकते जिने, उद्वाहन उभारणार
वातावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने गेल्या दोन महिन्यांत विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. बांधकाम प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचनाही तयार करण्यात आल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी विकासक या नियमांचे उल्लंघन करतात. पालिकेच्या यंत्रणेने गेल्या महिन्याभरात ८७७ बांधकाम प्रकल्पांची पाहणी केली. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणाऱ्या बांधकामांना लेखी सूचना, कारणे दाखवा नोटीसा व नंतर काम थांबवण्याच्या नोटीसा दिल्या. तसेच २८६ ठिकाणी काम थांबवण्याची (स्टॉप वर्क) नोटीस दिली. मात्र तरीही अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असून नियमावलीचे पालन केले जात नसल्याचे आढळून आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची गंभीर दखल घेतली व पालिका आयुक्तांना याप्रकरणी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावले होते. त्यानंतर पालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन बोरिवली पूर्व व भायखळ्यातील सर्व बांधकामे २४ तासांच्या मुदतीनंतर पूर्णत: बंद करण्याचा इशारा दिला.
हेही वाचा >>> मुंबईच्या तापमानाचा पारा ३४ अंशावर
‘वाईट’ हवेची नोंद होत असलेल्या भागातील प्रत्येक बांधकामांची पाहणी करून आवश्यक ती कारवाई केली जात होती. मात्र यावेळी तसे न करता त्या भागातील सर्वच बांधकामे थांबवण्यात येणार आहेत. विकासकांनी बांधकाम स्थळी नियम पाळत असल्याचे सिद्ध केल्यानंतरच त्यांना काम सुरू करण्याची परवानगी दिली जाईल, असेही पालिका आयुक्तांनी सांगितले. यामध्ये कोणत्याही विकासकाबाबत भेदभाव केला जाणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट सांगितले.
‘एमआरटीपी’अंतर्गत अजामीनपात्र गुन्हे दाखल करणार
काम थांबवण्याची नोटीस बजावल्यानंतरही कामे थांबविण्यात आली नाहीत, तर संबंधितांविरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमांच्या कलम ५२ (एमआरटीपी) अंतर्गत गुन्हे दाखल केले जातील. हे गुन्हे अजामीनपात्र आहेत, असेही आयुक्तांनी सांगितले.
बोरिवली पश्चिमेला हवा चांगली
बोरिवली पूर्वेमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक २०० च्या वर आहे. तर बोरिवली पश्चिममध्ये हाच स्तर ८० च्या आसपास आहे. त्यामुळे बोरिवली पूर्वमधील बांधकामे थांबवण्यात येणार आहेत.
मुंबईत सुमारे २२०० ठिकाणी बांधकामे
संपूर्ण मुंबईत सुमारे २२०० ठिकाणी खासगी स्वरुपाची बांधकामे सुरू आहेत. त्याव्यतिरिक्त शासकीय बांधकामे देखील सुरू आहेत. मुंबईच्या प्रत्येक विभागात सरासरी ५० ते ६० ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. मुंबईतील प्रदूषणाच्या कारणांपैकी ५० टक्के कारणे ही बांधकामे आणि वाहतूक यांच्याशी संबंधित आहेत. बांधकामातून उडणारी धूळ व वाहनांच्या धूरातून निघणारे कण यामुळे हवा प्रदूषित होत आहे. मुंबईत फारसे उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे मुंबईत औद्योगिक प्रदूषण नाही, असेही आयुक्तांनी सांगितले.
वरळी, नेव्हीनगरमध्ये हवा वाईट
वरळी आणि नेव्ही नगर परिसरातही हवेचा स्तर ‘वाईट’ आहे. यामध्ये येत्या दोन – तीन दिवसात सुधारणा झाली नाही, तर तिथेही याच पद्धतीने बांधकामे बंद करण्यात येतील, अशा इशारा पालिका आयुक्तांनी दिला. तसेच ज्या विभागातील हवा गुणवत्ता निर्देशांक २०० च्या वर जाईल त्या विभागातील एकेक बांधकामे बंद करण्यापेक्षा सर्वच बांधकामे बंद करण्यात येतील, असाही इशारा पालिका आयुक्तांनी दिला.
रस्त्यांची कामे सुरूच राहणार
मुंबई महापालिकेतर्फे विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे मात्र सुरूच राहणार आहेत. प्रदूषण कमी होण्यासाठी रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही कामे सुरू राहणार आहेत. मात्र विविध उपयोगिता वाहिन्यासाठी चर खणण्यास परवानगी दिली जाणार नाही.
सातत्याने वायू गुणवत्ता निर्देशांक २०० पेक्षा अधिक राहिल्यास कठोर पावले
विविध उपाययोजना राबवूनदेखील वायू गुणवत्ता निर्देशांक जर सातत्याने २०० पेक्षा जास्त जात असेल तर त्या परिसरातील कारणीभूत उद्योग आणि बांधकामे ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लान (GRAP- 4) अंतर्गत बंद करण्यात येतील.
प्रदूषणकारी रेडीमिक्स काँक्रिट वाहनांवर कार्यवाही करण्याचे निर्देश सहपोलिस आयुक्त (वाहतूक) यांना देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळामार्फत रेडीमिक्स काँक्रिट प्रकल्प, स्टोन क्रशर, हॉट मिक्स प्लांट हे बंद केले जातील.