लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : चालू आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले असून महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कंबर कसली आहे. महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाला आतापर्यंत साडेपाच हजार कोटी रुपयांहून अधिक महसूल जमा झाला आहे. पालिकेला उद्दिष्टाच्या ९१ टक्के करवसुली करण्यात यश आले असून १०० टक्के करवसुलीसाठी कर निर्धारण आणि संकलन विभाग प्रयत्न करीत आहे.

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना दिलेल्या मुदतीत करभरणा करता यावा, यासाठी महानगरपालिकतर्फे वेळोवेळी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. जकात रद्द झाल्यानंतर मालमत्ता कर महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनला आहे. मात्र, अलीकडच्या काळात मालमत्ता कर थकविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यात राज्य आणि केंद्र सरकारची प्राधिकरणे, पालिकेच्या इमारती व खासगी व्यावसायिक, बांधकाम विकासक यांच्या मालमत्तांचाही समावेश आहे. तसेच, भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर रचनेतील तक्रारी, न्यायालयातील प्रकरणांतील थकीत थकबाकीचा त्यात समावेश आहे.

५६२८.८२ कोटी रुपये कर वसूल

महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ६,२०० कोटी रुपये कर संकलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी म्हणजेच ३१ मार्चपर्यंत कर वसुली करण्यासाठी कर निर्धारण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी विशेष मेहनत घेत आहेत. कर थकवलेल्या सोसायट्यांमध्ये जाऊन रहिवाशांबरोबर संपर्क साधून त्यांना कर भरण्यासाठी मार्गदर्शन करणे, विविध आस्थापनांना भेटी देणे आदी कामांमध्ये पालिकेचे कर्मचारी गुंतले आहेत. महापालिकेला आतापर्यंत एकूण उद्दिष्टाच्या ९१ टक्के म्हणजेच ५६२८.८२ कोटी रुपये कर वसूल करण्यात यश आले आहे. तसेच, मार्च अखेरपर्यंत उर्वरित कर वसूल करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे.

थेट जप्तीची कारवाई

मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प आणि नागरी विकासाला गती देण्यासाठी पुरेसा महसूल असणे आवश्यक आहे. त्यामुळे मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांवर आता थेट जप्तीची कारवाई केली जात आहे. या मालमत्तांमध्ये भूखंड आणि निवासी-व्यावसायिक इमारती, व्यावसायिक गाळे, औद्योगिक गाळे आदींचा समावेश आहे. त्यामुळे मालमत्ता कर बुडवणाऱ्यांविरोधात आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे कर निर्धारण व संकलन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

वर्ष करवसुली
२०२१-२२५,७९१ कोटी
२०२२-२३ ५,५७५ कोटी
२०२३-२४४,८५९ कोटी
२०२४-२५५६२८.८२ कोटी (२५ मार्चपर्यंत)