मुंबई : माटुंगा रेल्वे स्थानक आणि भांडारकर मार्गावरील फुल बाजार परिसरातील ५२ अनधिकृत दुकानांवर महानगरपालिकेच्या एफ उत्तर विभागाने गुरुवारी निष्कासनाची कारवाई केली.

माटुंगा रेल्वे स्थानक आणि भांडारकर मार्गावरील फुल बाजार परिसरात पदपथ आणि रस्त्यांवर अतिक्रमण, तसेच अनधिकृत बांधकाम होत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या एफ उत्तर विभागातर्फे निष्कासनाची मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत सुमारे ३०० मीटर परिसरातील २२ अनधिकृत दुकाने, तसेच अतिक्रमण करण्यात आलेली ३० दुकाने निष्कासित करण्यात आली. उप आयुक्त प्रशांत सपकाळे, एफ (उत्तर) विभागाचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुमारे १०५ कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मदतीने करण्यात आली. यासाठी २ जेसीबी, ६ डंपर आणि २ अन्य वाहने तैनात करण्यात आली होती. तसेच पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

Story img Loader