मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक पदासाठी येत्या १० डिसेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांच्या नोंदणीकृत ई – मेल, तसेच भ्रमणध्वनी क्रमांकावर प्रवेशपत्राबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी वेळापत्रकानुसार संबंधित केंद्रावर निश्चित वेळेत उपस्थित राहावे, असे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : मुंबई : पश्चिम रेल्वेवर १३ वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढल्या
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेतील कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक संवर्गातील १७८ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून १९ सप्टेंबरपासून २० ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. एकूण २५ हजार ४७५ अर्ज महानगरपालिकेस प्राप्त झाले आहेत. या पात्र उमेदवारांसाठी १० डिसेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. या दिवशी तीन सत्रांमध्ये म्हणजेच सकाळी ९ ते ११, दुपारी १ ते ३ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत परीक्षा होणार आहे. या ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्याकरीता आवश्यक असलेल्या प्रवेशपत्राबाबतच्या सूचना उमेदवारांच्या नोंदणीकृत ‘ई-मेल’ वर तसेच भ्रमणध्वनी क्रमांकावर ‘एसएमएस’ द्वारे पाठविण्यात येणार आहेत. उमेदवारांनी या सूचना काळजीपूर्वक वाचून पुढील कार्यवाही करावी, असेही महानगरपालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.