पालिका आयुक्तांनी आदेश दिल्यानंतरही मुंबईतील आठ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील विहिरींची माहिती जल विभागाला अद्याप मिळू शकलेली नाही. तर १६ विभाग कार्यालयांतील अधिकाऱ्यांनी अर्धवट माहिती दिल्यामुळे विहिरींच्या दुरुस्तीसाठी खर्चाचे अंदाजपत्रक बनविणे जल विभागाला अशक्य झाले आहे. परिणामी, मुंबईतील विहिरींची पुन्हा एकदा पाहणी करण्याची वेळ पालिकेवर ओढवली असून या प्रकारामुळे पालिका आयुक्त कमालीचे संतप्त झाले आहेत.
उन्हाचा तडाखा वाढू लागला असून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाण्याअभावी दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत. मुंबईमध्ये पाण्याची चणचण निर्माण झाली तर उपलब्ध विहिरींतील पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी मुंबईकरांना उपलब्ध करुन देण्याचा मानस पालिका आयुक्त अजय मेहता यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार मुंबईमधील विहिरींची संख्या, त्यांची सध्याची स्थिती, पाण्याची पातळी, दुरुस्ती आणि सफाईची आवश्यकता आहे का याबाबत आढावा घेऊन जल विभागाला माहिती देण्याचे आदेश अजय मेहता यांनी पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमधील सहाय्यक आयुक्तांना दिले होते. मात्र २४ पैकी १६ विभाग कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या हद्दीतील विहिरींची संख्या जल विभागाकडे सादर केली. तसेच यापैकी काही विहिरी वापरात असल्याचे त्यांची कळविले आहे. मात्र विहिरींची सध्या स्थिती काय आहे, दुरुस्ती अथवा सफाईची गरज आहे का, दुरुस्तीसाठी किती खर्च अपेक्षित आहे याची कोणतीच माहिती सहाय्यक आयुक्तांनी जल विभागाला दिलेली नाही. तर आठ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील विहिरींची माहिती सहाय्यक आयुक्तांनी अद्याप दिलेली नाही.
जल विभागाला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार १६ विभागांमध्ये ३०३० खुल्या विहिरी, ५,३७२ कूपनलिका आणि ९४४ रिंगवेल आहेत. संबंधित सहाय्यक आयुक्तांच्या म्हणण्यानुसार यापैकी सुमारे ७० टक्के विहिरी, कूपनलिका आणि रिंगवेल वापरात आहेत. परंतु वापरात असलेल्या या विहिरी, कूपनलिका, रिंगवेलची दुरुस्ती अथवा सफाई करण्याची आवश्यकता आहे की नाही याबाबत सहाय्यक आयुक्तांनी आपल्या अहवालात कोणतीच माहिती दिलेली नाही.
एकीकडे नगरसेवक विहिरींच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाच्या मागे तगादा लावत आहेत, तर दुसरीकडे सहाय्यक आयुक्तांनी त्यासंदर्भात कोणतीच माहिती दिलेली नाही. त्यामुळे विहिरींच्या दुरुस्तीबाबत खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे जल विभागाला अवघड बनले आहे. तर सहा विभागांमध्ये किती विहिरी, कूपनलिका आणि रिंगवेल आहेत याची माहितीच जल विभागाला मिळालेली नाही. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच विहिरींची सफाई अथवा दुरुस्ती होणे गरजेचे होते. परंतु ‘होय नाम्या, सांग काम्या’ उक्तीप्रमाणे अधिकाऱ्यांनी केवळ विहिरी, कूपनलिका आणि रिंगवेलची संख्या जल विभागाकडे सादर केली. परिणामी, आता पुन्हा एकदा मुंबईतील विहिरी, कूपनलिका, रिंगवेलचा युद्धपातळीवर आढावा घेण्याची वेळ पालिकेवर ओढवली आहे. या प्रकारामुळे पालिका आयुक्त संतप्त झाले असून या प्रकरणाची त्यांनी गंभीर दखल घेतली आहे. हे प्रकरण सहाय्यक आयुक्तांना भोवण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा