मुंबई : लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या कामांना वेग येऊ लागला आहे. रस्त्यांच्या कामांसाठी मागवलेल्या निविदांना ज्या कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे त्यांच्याशी चर्चा करून लवकरच कार्यादेश दिले जाणार आहेत.

पावसाळा तोंडावर आल्यामुळे आता रस्ते काँक्रीटीकरणाची कामे थांबवण्यात आली आहेत. मात्र नवीन कामांची निविदा प्रक्रिया या पावसाळ्याच्या काळात पूर्ण करण्यात येईल. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात दिलेल्या कंत्राटातील शहर भागातील कामे रखडल्यामुळे या कामांसाठी पुन्हा एकदा निविदा मागवण्यात आल्या होत्या. तर फेब्रुवारी महिन्यात पालिका प्रशासनाने मुंबईतील आणखी ४०० किमी लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांसाठी निविदा मागवल्या होत्या. या दोन्ही निविदांसाठी एप्रिल महिन्यात निविदाकार पुढे आले होते. मात्र लोकसभेच्या निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे पालिका प्रशासनाने कोणाला कंत्राट द्यायचे याबाबत निर्णय घेतला नव्हता. मात्र निवडणूक संपली असून निकालही लागले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने आता ही निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे ठरवले आहे. पावसाचे चार महिने काम सुरूच होऊ शकणार नसले तरी निविदाकारांशी चर्चा करून कंत्राटदार निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्यक्षात ही कामे ऑक्टोबरमध्ये सुरू होऊ शकणार आहेत.

हेही वाचा…पनवेल मार्गावरील वावर्ले या सर्वाधिक लांब बोगद्याचे खोदकाम पूर्ण, कर्जतसाठी पर्यायी रेल्वे मार्गिकेला गती

येत्या दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे निर्देश दिले होते. ६,०७८ कोटींच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यातून पाच नामांकित कंत्राटदारांची निवड करण्यात आली व जानेवारी २०२३ मध्ये कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन करण्यात आले होते. ही रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. तर शहर भागातील रस्ते कंत्राटदाराने एकही काम सुरू न केल्यामुळे त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर शहर भागासाठी नव्याने निविदा मागवल्या. ही निविदा प्रक्रिया सुरू असताना फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा संपूर्ण मुंबईतील ४०० किमीच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदा प्रक्रियेला १५ कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे.

शहरातील रस्त्यांसाठी दोन निविदाकार मुंबईतील शहर भागातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे गेल्या वर्षभरापासून वादात सापडली आहेत. त्यानंतर या रखडलेल्या कामासाठी काढलेल्या पुनर्निविदाही न्यायालयीन कचाट्यात सापडल्या होत्या. त्यामुळे शहर भागातील कामांसाठी तिसऱ्यांदा मागवलेल्या निविदांना दोन निविदाकारांनी प्रतिसाद दिला आहे. त्यापैकी एनसीसी या संस्थेने कमी बोली लावली असून त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. तर नव्या कामांसाठी आलेल्या कंत्राटदारांशीही वाटाघाटी पूर्ण करून लवकरच कार्यादेश दिले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसाळ्यात कामे होणार नसली तरी वाहतूकीच्या परवानगी घेण्याचे काम पूर्ण केले जाईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा…ईडीने जप्त केलेली १८० कोटींची मालमत्ता प्रफुल्ल पटेलांना परत मिळणार; ‘वॉशिंग मशीनची कमाल’, राऊतांचा आरोप

आचारसंहितेचा पेच लोकसभेची निवडणूक पूर्ण झाली असून निकालही लागले आहेत. मात्र पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीची आचारसंहिता रस्त्यांच्या कामांसाठी लागू आहे का याबाबत आम्ही विचारणा करू व त्यानंतरच कार्यादेश दिले जातील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

Story img Loader