वांद्रे, खारमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात; लहान मुले, तृतीयपंथीयांचा विचार करून उभारणी
इंद्रायणी नार्वेकर
मुंबई : झोपडपट्टय़ांमध्ये २२ हजार शौचालये बांधण्याचा ‘लॉट ११ प्रकल्प’ गुंडाळल्यानंतर आता पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने आदर्श शौचालयांचा संकल्प सोडला आहे. सर्व सुविधांनी युक्त आणि तंत्रज्ञानाचा वापर करून स्वच्छतेचे निकष पूर्ण करणारी आदर्श शौचालये वांद्रे, खार, सांताक्रूझचा भाग असलेल्या एच पूर्व विभागात प्रायोगिक तत्त्वावर बांधण्यात येणार आहेत.
मुंबईत ६० टक्के नागरिक झोपडपट्टीत राहात असून या लोकसंख्येला पुरेशी शौचालये उपलब्ध नाहीत. त्यामुळे मुंबईतील शौचालयांची समस्या गंभीर आहे. शौचालये बांधण्यासाठी मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळेही अपुरे आहे. त्यामुळे आतापर्यंत पालिकेला स्वच्छता सर्वेक्षणात कमी गुण मिळत होते. पालिकेने मुंबईला हागणदारीमुक्त करण्यासाठी शौचालयांची संख्या वाढवण्याचे ठरवले आहे. २२ हजार शौचकूप बांधण्याचा प्रकल्प बारगळल्यानंतर आता आदर्श शौचालय बांधण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
आधीच्या प्रकल्पात कोणतेही सर्वेक्षण न करता शौचालयाची संख्या ठरवण्यात आली होती. आता मुंबईतील झोपडपट्टय़ांचे सर्वेक्षण करून किती शौचालयाची गरज आहे, महिला-पुरुषांची संख्या याचा विचार करून शौचालय व शौचकूपांची संख्या ठरवणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांनी दिली. सध्या अनेक झोपडपट्टय़ांमध्ये जितकी शौचालये पुरुषांसाठी, तितकीच महिलांसाठी असतात. मात्र पुरुषांची संख्या जास्त असल्यामुळे त्या शौचालयांवर ताण वाढत जातो. तसेच लहान मुले, तृतीयपंथी, अपंग यांचा विचारच केला जात नाही. या सगळय़ा घटकांना सामावून घेणारी शौचालये बांधण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्वच्छतेबाबतही काळजी
आदर्श शौचालयामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून स्वच्छतेची काळजी घेतली जाणार आहे. गंध, वायू यांचे प्रमाण हेरणारे सेन्सर शौचालयात बसवले जाणार असून विशिष्ट वायूचे प्रमाण वाढले की शौचालयाला लाल रंगाचा निदर्शक दिवा पेटेल. याची माहिती पालिकेच्या संबंधित विभागालाही कळेल. त्यामुळे त्यावर तातडीने उपाययोजना करता येईल. शौचालय चालवणाऱ्या संस्थेने नीट देखभाल केली नाही असे आढळल्यास संस्थेचे कंत्राट रद्द करता येईल, असेही हसनाळे यांनी सांगितले.
निवारा केंद्राचाही समावेश
मुंबईत प्रवास करताना अनेकदा महिलांना प्रसाधनगृहाची गरज असते, कधी कपडे बदलण्यासाठी जागा हवी असते, कोणाला बालकांना स्तनपान देण्यासाठी निवारा हवा असतो. या सर्व गरजांसाठी या शौचालयात जागा असेल. शौचालय चालवण्यासाठी निधी उभा करता यावा म्हणून जाहिराती लावण्यास परवानगी देता येईल, शौचालयांच्यावर निवारा केंद्र उभारता येईल. त्याकरिता लवकरच धोरण तयार करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रत्येक शौचकुपाचा २०० जणांकडून वापर
एक शौचालय ३५ ते ५० लोक वापरतील अशा पद्धतीने एक शौचकूप बांधण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात मुंबईत त्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट वापर होतो. काही ठिकाणी तर २०० हून अधिक नागरिक एका शौचकुपाचा वापर करतात.