मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने ‘ॲक्वा’ जलआकार प्रणालीच्या परिरक्षण व सुधारणेचे काम हाती घेतले आहे. याअंतर्गत प्रणालीवरील सर्व माहिती क्लाऊड सर्व्हरवर स्थलांतरित केली जाणार आहे. येत्या ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ पासून ते १५ एप्रिल रोजी सकाळी ९ पर्यंत जल अभियंता विभागाची ‘ॲक्वा’ जलआकार देयके व संकलन प्रणाली तसेच त्यावर आधारित इतर सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. परिणामी, नागरिकांना ऑनलाइन व ऑफलाइन जलदेयके भरता येणार नाहीत. नागरी सुविधा केंद्रांमध्ये ही सेवा बंद असेल. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर जलदेयकांची माहितीही उपलब्ध होणार नाही.

महानगरपालिकेच्या ॲक्वा जलआकार (पाणीपट्टी) देयके आणि संकलन प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना जलदेयके (जलआकार) भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याबाबतची अन्य माहितीही या प्रणालीवर पाहता येते. मात्र, महापालिकेने या प्रणालीचे परिरक्षण व सुधारणेचे काम हाती घेतले आहे. महानगरपालिका मुख्यालयासह सर्व विभाग कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्रातील जलआकार भरणा, ऑनलाईन जलआकार भरणा, तसेच ‘ॲक्वा’ प्रणालीशी संबंधित सर्व सेवा बंद राहणार आहेत. तसेच महानगरपालिका संकेतस्थळावरील जलआकाराशी संबंधित कोणतीही माहिती या कालावधीत उपलब्ध होणार नाही. जलआकार देयक व संकलन प्रणाली बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

‘ॲक्वा’ प्रणाली ही मुंबईतील जलपुरवठ्याचे देयक आणि संकलन व्यवस्थापनासाठी वापरली जाणारी अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. ही प्रणाली अधिक सक्षम, सुरक्षित करण्यासाठी महापालिकेने परिरक्षणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांना अधिक गतिमान आणि अचूक सेवा मिळण्यास मदत होईल. या कामकाजाच्या कालावधीत कोणतीही तांत्रिक सेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांनी जलदेयके त्यापूर्वीच भरावीत, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.