मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या निर्देशानुसार मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये डोक्यावरून मैला वाहून नेणाऱ्या कामागारांचे (मेहतर) सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मुंबईमध्ये ६ ते १६ ऑक्टोबर दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेने यासंदर्भात २०१३ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामागारांची एकही नोंद झाली नव्हती.

केंद्र सरकारने हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम २०१३ पारित केला आहे. या कायद्याची ६ डिसेंबर २०१३ पासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. कायद्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार बृमुंबई शहर आणि उपनगरांमध्ये डोक्यावर मैला वाहून नेणारे कामगारांचे (मेहतर) २०१३ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी मुंबईत हाताने मैला उचलणाऱ्या एकाही सफाई कामगारांची नोंद झाली नव्हती.

हेही वाचा >>>मुंबईत रविवारी हलक्या सरींचा अंदाज

हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या विषयाच्या निमित्ताने नुकतीच रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाच्या सचिवांनी सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचे सर्वेक्षण करण्याबाबत सूचित केले आहे. या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सर्वेक्षणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने एका त्रयस्थ संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पथनाट्याच्या माध्यमातूनही या कामगारांच्या विषयाची जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच सर्वेक्षणाअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी जाहीर सूचना प्रत्येक विभागातील शौचालय, सेक्शन चौकी, मोटर लोडर चौकी आदी ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.