मुंबई : मीठाशिवाय अन्नाला चव नाही हे खरे असले तरी जेवणातील मिठाचा अतिवापर हा सुद्धा आरोग्यासाठी हानिकारक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतीय व्यक्ती अपेक्षित ५ ग्रामपेक्षा जास्त मिठाचे सेवन करतात. तर मुंबईकर प्रतिदिन ९ ग्रॅम मीठाचे सेवन करतात. त्यामुळे रोजच्या आहारात मीठ व साखरेचे प्रमाण कमी करण्याबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी मुंबई महापालिकेने मीठ व साखर जनजागृती’ अभियानाचा संकल्प सोडला आहे.
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या एका कार्यक्रमात मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत ‘मीठ व साखर जनजागृती’ या अभियानाला प्रारंभ झाला. याप्रसंगी ‘मीठ व साखर जनजागृती’ अभियानाच्या भित्तीफलकाचे प्रकाशन करण्यात आले. मुंबईकरांच्या आहारामध्ये प्रतिदिन वापरल्या जाणाऱ्या मिठाचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश भूषण गगराणी यांनी या कार्यक्रमादरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, मुख्य वैद्यकीय अधिक्षक (उपनगरीय रूग्णालये) डॉ. चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते. भविष्यातील पिढ्यांमध्ये असंसर्गजन्य रोगांचा (NCDs) प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे मीठ आणि साखरेच्या अतिरिक्त सेवनाबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. रोजच्या आहारात मीठ व साखरेचे प्रमाण कमी करण्याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. समुदाय स्तरावर व शाळांमध्ये अतिरिक्त मीठ व साखर याबाबत जनजागृती करून लहान वयातच आरोग्यदायी सवयी रुजवण्याचे महत्त्व सांगितले जाईल.

मीठ व साखरेचा अतिवापर टाळा

जागतिक आरोग्य संघटना आणि मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या स्टेप्स सर्व्हे २०२१ नुसार, मुंबईतील नागरिकांमध्ये ३४ टक्के उच्च रक्तदाब आणि १८ टक्के मधुमेहाचे प्रमाण आढळून आले आहे. आपल्या अन्नामध्ये चवीसाठी वापरल्या जाणाऱ्या सामान्य घटकांपैकी मीठ आणि साखर एक आहे. मीठ व साखर यांच्या अतिवापरामुळे उच्च रक्तदाब, मधूमेह, हृदयविकार यांसारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे मुंबईकर नागरिकांनी मिठाच्या सेवनाचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहेे.

अभियानाची उद्दिष्टे

लहान वयात मीठाचा वापर कमी केल्याने तरुण वयात उच्च रक्तदाब, मधूमेह व हृदयविकार इत्यादी आजार होण्याचा धोका कमी करता येते, असे विविध देशात केलेल्या संशोधनाद्वारे आढळून आले आहे. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून व मे महिन्यात साजरा करण्यात येणाऱ्या (मीठ जनजागृती अभियानाचा आठवड्याच्या (Salt Awareness Week) निमित्ताने मुंबई महानगरपालिका तसेच पार्टनरशीप फॉर हेल्दी सिटीज (Partnership for Healthy Cities) आणि अमेरिकेअर्स इंडिया फाऊंडेशन (Americares India Foundation) यांच्या सहकार्याने “मीठ व साखर जनजागृती” अभियान राबविण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation will launch a salt and sugar awareness campaign to reduce consumption mumbai print news sud 02