मुंबई : सागरी किनारा मार्ग परिसरात हेलिपॅड तयार करता येईल का याबाबत मुंबई महापालिका आता चाचपणी करणार आहे. मंगळवारी राज्य सरकारने पालिकेच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला त्यावेळी हेलिपॅडबाबतची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार याबाबतची व्यवहार्यता तपासण्यासाठी पालिका प्रशासन आता सल्लागार नेमणार आहे. तसेच वरली जेट्टी येथे जलवाहतूक किंवा हवाई वाहतूकीसाठी बहुउद्देशीय वाहतूक थांबा (मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट) उभारता येईल का याची चाचपणी केली जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या सुरू असलेल्या सुमारे एक लाख ४१ हजार कोटी रुपयांच्या तसेच प्रस्तावित सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानभवनात आढावा घेतला. त्यावेळी सागरी किनारा मार्गावर हेलिपॅड उभारण्याचा विचार करण्याची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार हेलिपॅड उभारण्याकरीता व्यवहार्यता तपासण्यासाठी पालिका प्रशासन आता सल्लागार नेमणार आहे. मात्र केवळ हेलिपॅडच नाही तर जलवाहतूकीसाठीही थांबा देता येईल का याचाही विचार पालिका प्रशासन करीत आहे. या परिसरात मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट सेंटर अर्थात बहुउद्देशीय वाहतूक थांबा देता येईल का याचा विचार पालिका करीत आहे.

मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सागरी सेतूपर्यंत सागरी किनारा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून हा रस्ता पूर्णत: खुला झाला आहे. मात्र त्याच्या पुढे जाऊन इथे रस्ते वाहतूकीबरोबरच बहुउद्देशीय वाहतूक थांबा उभारण्याबाबतची माहिती देताना पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सागरी किनारा मार्ग तयार करताना दोन तात्पुरत्या जेट्टी उभारण्यात आल्या होत्या. त्यापैकी दोन जेट्टीपैकी अमरसन येथील जेट्टी तोडण्यात आली. आता वरळी कोळीवाडाजवळच जेट्टी असून त्याचा जलवाहतूकीसारख्या अन्य कामासाठी वापर करता येईल का याचा विचार सुरू असल्याचे मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी सांगितले.

मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर मुंबईच्या टोकापर्यंत म्हणजेच नरिमन पॉईंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारा रस्ता प्रकल्प टप्प्याटप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गंत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्ीट उड्डाणपूल) ते वरळी वांद्रे सी लिंकच्या टोकापर्यंत उभारण्यात आला आहे. १०.५८ किमी इतकी लांबी आहे. या प्रकल्पात १८ आंतरबदल मार्गिका आहेत. या मार्गांवरून सरासरी २४ हजार वाहने धावतात. या मार्गांवरून रस्ते प्रवास होत असतानाच आता त्याला जलवाहतूक तसेच हवाई वाहतुकीचीही जोड देऊन मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट उभारता येते का याचा विचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader