आरोग्य, व्यायाम, क्रीडाप्रकार याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, व्यायामाचे महत्त्व नागरिकांना समजावे यासाठी मुंबई महापालिकेने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर महिन्यात ही मुख्य मॅरेथॉन होणार असून मॅरेथॉनची पूर्वतयारी म्हणून येत्या २६ फेब्रुवारी रोजी प्रोमो रन आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर पाच हजार नागरिकांना नोंदणी करता येणार आहे.
दरवर्षी खासगी कंपनीतर्फे मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षीपासून प्रथमच मुंबई महापालिकेच्यावतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. ही मुख्य स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात होणार असून पूर्वतयारीची एक प्रोमो रन किंवा रंगीत तालीम स्वरूपाची स्पर्धा २६ फेब्रुवारीला होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट इंडिया’ या मोहिमेची सुरुवात ऑगस्ट २०१९ मध्ये केली. आरोग्य, व्यायाम, विविध क्रीडाप्रकार याबाबत जनजागृती व्हावी आणि देशी क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ‘फिट इंडिया’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ‘फिट इंडिया’ मोहिमेअंतर्गत व आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी मुंबईमध्ये ‘अर्ध मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त, प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात मुंबईमध्ये मॅरेथॉनसाठी पूर्वतयारी म्हणून ‘प्रोमो रन’चे आयोजन करण्यात येणार आहे. प्रोमो रन ३ कि.मी., ५ कि.मी. व १० कि.मी. अशा ३ टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात येणार असून, यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर पाच हजार नागरिकांना नोंदणी करता येईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या ‘फिट मुंबई बीएमसी हाफ मॅरेथॉन’चे समन्वयक सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली. या ‘प्रोमो रन’बाबत एका समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मुंबई पोलीस दल, वाहतूक पोलीस यांच्यासह मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांचे व खात्यांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
या ‘प्रोमो रन’मध्ये भाग घेणाऱ्या सर्वांना स्वयंचलित संगणकीय पद्धतीने नोंद करणारे उपकरण देण्यात येणार. या उपकरणामध्ये धावण्यास सुरुवात केल्यापासून ते समापन रेषेपर्यंत (फिनिश लाईन) पोहोचण्यास किती वेळ लागला, याची निश्चित नोंद स्वयंचलित पद्धतीने होणार. स्पर्धेपूर्वी स्पर्धकांना उभे राहण्यासाठी व वॉर्म-अप करण्यासाठीची जागा, स्पर्धेच्या अखेरीस आवश्यक असणारा ‘रिकव्हरी एरिया’, आरोग्य व वैद्यकीयविषयक बाबी आदी विषयांवर सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली. स्पर्धे सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची वाहने उभी करण्यासाठी तात्पुरते वाहनतळ, स्पर्धक व स्वयंसेवकांसाठी न्याहारीसह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, निर्धारित रंगांचे टी-शर्ट आदींबाबत चर्चा करण्यात आली. या स्पर्धांला होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची सूचना आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात आली आहे.
हेही वाचा- “बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्यांपासून दिलासा द्या”, खासदार राहुल शेवाळेंची उच्च न्यायालात धाव
या स्पर्धेमध्ये मुंबईकरांसह मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. महानगरपालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील सेल्फी पॉईट येथून सकाळी ७ वाजता मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. यातील १० कि.मी.च्या टप्प्याची सुरुवात सकाळी ७.०० वाजता, ५ कि.मी.च्या टप्प्याची सुरुवात सकाळी ७.१५ वाजता आणि ३ कि.मी. टप्प्याची सुरुवात सकाळी ७.३० वाजता होणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल सहभागी झाले होते. २१.९७ किमीची अर्ध मॅरेथॉन आयुक्तांनी दोन तास २८ मिनिटांत पूर्ण केली. गेली १८ वर्षे या स्पर्धेत सहभागी होण्याचा विक्रम आयुक्तांनी केला आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनीही आतापर्यंत १५ अर्ध मॅरेथॉन आणि तीन पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला होता. यंदाची ४२ किमीची पूर्ण मॅरेथॉन मोटे यांनी पूर्ण केली होती. महानगरपालिकेच्या मुंबई मॅरेथॉनच्या समन्वयाची जबाबदारी मोटे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.