परळ टीटी पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरच पालिकेच्या पूल विभागाच्यावतीने हाती घेतले जाणार आहे. या पुलाच्या पृष्ठभागावर तब्बल २२ सांधे असून वाहनचालकांना या सांध्यामुळे हादरे बसतात. त्यामुळे या सांध्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय पूल विभागाने घेतला आहे. पुलावर केवळ २२ ऐवजी चारच सांधे ठेवून बाकीचे सांधे भरण्यात येणार आहे. या कामासाठी १८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
हेही वाचा- मुंबई सुशोभीकरण प्रकल्प रखडला; घोषणेला दोन महिने उलटूनही प्रक्रिया निविदा पातळीवरच
परळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील वाहतूक ज्या परळ टीटी पुलावरून जाते त्या पुलावर सकाळ संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. पूर्व उपनगरातील वाहतूक दक्षिण मुंबईत येण्यासाठी परळ टीटी पुलाचा मोठा उपयोग होतो. पावसाळ्यात हिंदमाता परिसरात पाणी साचल्यास या पुलावर जाणे वाहनांना मुश्कील होत होते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी पालिकेने हिंदमाता पूल आणि परळ टीटी पूल या दोन पुलांच्या मध्ये उन्नत रस्ता तयार केला होता. त्यामुळे पावसाळ्यातही वाहतूक सुरळीत सुरू होती. मात्र परळच्या या पुलावर मोठ्या प्रमाणावर सांधे (जॉईंटस) आहेत. त्यामुळे वाहनांना सतत हादरे बसतात. दर १० मीटर अंतरावर हे सांधे असल्यामुळे पावसाळ्यात वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
दुचाकीस्वारांना या पुलावरून जाताना त्रास होतो. पालिकेच्या पूल विभागाने आता या सांध्यांची संख्या कमी करण्याचे ठरवले आहे. या पुलावर २२ सांधे असून त्यापैकी १८ सांधे बुजवण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेने कंत्राटदार नेमला असून वाहतूक विभागाच्या परवानगीनंतर हे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी १७.४८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी साधारण सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.