मुंबई : मुंबईच्या एका टोकाला, पण मुंबईपासून दूर असलेल्या गोराई गावाची पाणीटंचाई लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. या गावातील टेकडीवरील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेचे उत्तन रोड येथे शोषण टाकी व उदंचन केंद्र बांधण्याचे ठरवले आहे. या कामासाठी साडेनऊ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. येत्या आर्थिक वर्षात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. पश्चिम उपनगरात बोरिवली येथे खाडीच्या पलिकडे असलेल्या गोराई परिसरात गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रचंड पाणी टंचाई सुरू आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे पूर्ण भरलेली असली तरी येथील गावांमध्ये वर्षाचे बारा महिने पाणी टंचाई असते. मुंबईत कधी पाणी कपात लागू केली की या भागातील नळांना पाण्याची अक्षरश: धार लागते. गोराई येथील गावांतील रहिवाशांनी आतापर्यंत पाण्यासाठी अनेक आंदोलने केली, मात्र पाणी पुरवठ्याची समस्या दूर होऊ शकलेली नाही.
पाणीपुरवठ्याची तपासणी करायला जाणाऱ्या अधिकाऱ्यांना अनेकदा नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. अनेकदा जल अभियंता विभागातील कर्मचाऱ्यांना डांबून ठेवण्याचे प्रकारही घडले आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून या परिसरात कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे पालिकेच्या अभियंत्यांनी अनेकदा या ठिकाणी जाऊन पाहणी केली, वेगवेगळे प्रयोग केले, पाण्याच्या वेळा बदलून पाहिल्या, मात्र तरीही पाण्याची समस्या सुटलेली नाही. मात्र आता पालिका प्रशासनाने या विभागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेतला आहे. या परिसरात पाण्याची भूमिगत टाकी बांधण्यात येणार असून त्यात पाणी साठवून ते मोटर पंपाच्या सहाय्याने उंचावरील गावांना वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे उत्तनच्या टेकडीवरील गावांना, तसेच एस्सेल वर्ल्डकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील गावांना पाणीपुरवठा होऊ शकेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
खाडी पलिकडच्या उंचावरील गोराई गावाना पाणीपुरवठा करण्यासाठी उत्तन रोड, गोराई चर्च बस थांबा येथे शोषण टाकी व उदंचन केंद्र बांधण्यात येणार आहे. तसेच नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या कामामुळे गोराईला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होईल व एकंदरीत पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे. या कामासाठी एकूण ९.४७ कोटींचा खर्च अपेक्षित असून या कामासाठी चालू आर्थिक वर्षात २.२७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
गोराईमध्ये २० हजार नागरिक वास्तव्यास आहेत. गोराईला मालाड, मनोरीहून पाणीपुरवठा होतो. मालाड मिठ चौकीहून पाणीपुरवठा सुरू होतो. मात्र मनोरीमध्ये अनेक अनधिकृत बांधकामे असून त्यांना नळजोडणी दिल्यामुळे गोराईमध्ये पाण्याचा दाब कमी होतो. अनधिकृत बांधकामे असून त्यांना नळजोडणी दिल्यामुळे गोराईमध्ये पाण्याचा दाब कमी असतो, असा आरोप या विभागातील सामाजिक कार्यकर्ते शिवा शेट्टी यांनी केला आहे. दरम्यान, गोराई परिसर जमिनीपासून तुटलेला असल्यामुळे व पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेच्या शेवटच्या टोकाला हा भाग असल्यामुळे येथे पाण्याचा दाब कमी आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जल अभियंता विभाग प्रयत्नशील असून काही दीर्घ मुदतीच्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत, त्यासाठी वेळ लागू शकतो, अशी माहिती आर मध्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.