संदीप आचार्य

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्राच्या ग्रामीण आरोग्याचा भार हा प्रामुख्याने आशा सेविकांवर अवलंबून असतो. त्यांच्याच माध्यमातून राज्याचा आरोग्य विभाग गर्भवती व बालकांचे आरोग्य जपणूक, विविध साथींचा आढावा घेण्याचे काम तसेच वृद्धांचे आरोग्य, मानसिक आणि अन्य आजारांशी निगडित विविध विषय हाताळणे, मार्गदर्शन, माहिती गोळा करणे आणि रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करण्याची कामे करत असते. आशांचे हे महत्त्व ओळखून मुंबई महापालिकेनेही प्रामुख्याने झोपडपट्टी विभागात ५,५०० आशा सेविकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या निकषांच्या पलीकडे जाऊन या आशा सेविकांना १० ते १२ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यामध्ये आरोग्य विभागाच्या अखत्यारीत सुमारे साठ हजार आशा सेविका काम करीत असून प्रामुख्याने राज्याच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या या आशा सेविकांना जवळपास ७२ प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येतात. मुंबई महापालिच्या अखत्यारीतील आशा सेविकांच्या माध्यमातून झोपडपट्टी विभागात आरोग्यविषयक जनजागृतीसाठी मासिक सभांचे आयोजन, जन्म-मृत्यूची नोंदणी, पात्र जोडप्यांची यादी, लसीकरणासाठी पात्र बालकांची नोंद, गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व व पश्चात आवश्यक असलेल्या तपासण्यांची नोंद ठेवणे आदी ३९ प्रकारची आरोग्यविषयक कामे प्राधान्याने करावी लागतात. त्यांनी केलेल्या कामाच्या बदल्यात साधारणपणे आठ हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न या आशा सेविकांना मिळत असल्याचे पालिका आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मुंबईतील गरीब वस्तींमधील वाढलेली लोकसंख्या, महिला व लहान मुलांची संख्या आणि त्यांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात या भागातील आरोग्यविषयक माहिती हाती असणे तसेच या वर्गाला आरोग्यविषयक सेवा योग्यप्रकारे पोहोचविण्याचे महत्त्व अधिक प्रकर्षांने अधोरेखित झाल्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी साडेपाच हजार आशा सेविकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation will soon appoint asha workers amy