एकेकाळी मुंबईची शान असलेली श्रीमंतीचे प्रतीक मानली जाणारी व्हिक्टोरिया बग्गी आता आगामी काळात मुंबईत दिसणार नाही. प्राणिमित्रांनी उच्च न्यायालयात याबाबत केलेल्या याचिकेनुसार मुंबईत गाडीला घोडे जुंपण्यास मनाई करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर मुंबईतील घोडागाडीला जुंपलेल्या घोडय़ांची जबाबदारी यापुढे महापालिकेला स्वीकारावी लागणार आहे. या व्हिक्टोरियावर गुजराण करणाऱ्या कुटुंबांची व्यवस्था करण्याची जबाबदारी न्यायालयाने राज्य शासनाला दिली असताना शासनाने तीही जबाबदारी पालिकेवर ढकलण्याचा प्रयत्न केला असून घोडागाडीच्या मालकांची जबाबदारी पालिका घेऊ शकत नाही, असा पवित्रा पालिकेने घेतल्याने या व्हिक्टोरियाच्या मालकांचे काय होणार का कळीचा मुद्दा आहे. प्राणिमित्र संघटनेने, गाडीला घोडे जुंपून ओढणे ही क्रूरता असून त्यावर बंदी घालावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली होती. न्यायालयाने आपल्या निर्णयात ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत बंदी लागू करण्याचे आदेश दिले होते. तसेच जून २०१६ पर्यंत त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशात मुंबईतील घोडय़ाची जबाबदारी महापालिकेने घ्यावी तसेच या घोडागाडी मालकांच्या कुटुंबांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाने घ्यावी व त्याच्या पूर्ततेचा अहवाल न्यायालयाला सादर करण्यात यावे. महापालिकेच्या सूत्रांनुसार मुंबईत आजघडीला १८० व्हिक्टोरिया असून दादर शिवाजी पार्क परिसरातही अनेक घोडागाडय़ा तसेच घोडे मालक मुलांना घोडय़ांवरून फिरवत असतात.
न्यायालयाच्या आदेशानुसार या घोडय़ाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी महापालिकेने एक स्वयंसेवी संस्था नेमण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा भार पालिका स्वीकारणार असल्याचे पालिकेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले, तर सुमारे ७०० कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून असून त्यांची जबाबदारी राज्य शासनाने घेणे अपेक्षित होते. तथापि राज्य शासनाने ही जबाबदारीही महापालिकेवर ढकलली असून त्या संदर्भातील पत्रही शासनाने पालिकेला पाठवले आहे. घंोडय़ाबरोबर घोडय़ांच्या मालकाची जबाबदारी घेण्यास पालिका तयार नसून शासनाच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना प्रकल्पबाधित म्हणून जागा पालिकेने दिली पाहिजे. अथवा फेरीवाला म्हणून त्यांना पालिकेने परवाने द्यावेत अशी शासनाची भूमिका असल्याचे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. तथापि फेरीवाले धोरण राज्य शासनाने अद्यापि मंजूर केलेले नसताना या घोडेमालकांना परवाने देणार कसे असा पालिका अधिकाऱ्यांचा सवाल आहे. प्राणिमित्रांमुळे घोडय़ांचा प्रश्न सुटला असला तरी त्यांना सांभाळणाऱ्या ७०० कुटुंबांचा प्रश्न आता वादाचा बनला आहे.
ब्रिटिश राजवटीत सर जमशेटजी जीजीभाई बारोनेट यांनी इंग्लंडच्या राणीला ३० हजार रुपये किमतीचे दोन अरबी घोडे भेट म्हणून पाठवले होते. त्या काळातील नोंदीनुसार मुंबईत दोन व चार चाकांच्या २६६८ घोडागाडय़ा होत्या तर ३०५०८ घोडे होते.