लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा आगामी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या ४ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. पालिकेची मुदत संपल्यानंतर प्रशासकीय राजवटीतील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. तर आयुक्त भूषण गगराणी यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाचे आकारमान ६५ हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सन २०२५-२६ चे अर्थसंकल्‍पीय अंदाज मंगळवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात सादर करण्यात येणार आहेत. नियमानुसार आधी शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर होईल. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी हे शिक्षण खात्याचा अर्थसंकल्‍पीय अंदाज महानगरपालिका प्रशासक भूषण गगराणी यांच्यासमोर सादर करतील. त्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अर्थसंकल्‍पीय अंदाज सादर करतील.

मुंबई महापालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प ५९ हजार ९५४ कोटी रुपयांचा सादर करण्यात आला होता. एका राज्याच्या अर्थसंकल्पाइतके या अर्थसंकल्पाचे आकारमान असते. मार्च २०२२ मध्ये पालिकेची मुदत संपल्यापासून सध्या मुंबई महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट आहे. पालिकेची निवडणूक अद्याप न झाल्यामुळे या वेळी देखील
प्रशासकीय स्तरावर अर्थसंकल्प सादर होणार आहे.

प्रशासकीय राजवटीत सादर होणारा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. पालिकेच्या घटलेल्या मुदतठेवी, ‌वाढलेले खर्च यामुळे यंदाही अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व आहे. मुंबई महानगरपालिकेत सध्या प्रशासक नियुक्त असून, लोकप्रतिनिधी नसल्याने सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प देखील गेल्यावर्षीप्रमाणे केवळ प्रशासन स्तरावर सादर केला जाणार आहे.

या अर्थसंकल्पातून पालिकेच्या आर्थिक स्थितीचाही अंदाज येणार आहे. श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांपासून खालावू लागली आहे. जकात बंद झाल्यानंतर महसूलाचे नवे मोठे स्त्रोत उभे करण्यात अपयश आले आहे. मालमत्ता कराच्या बिलांचा वाद झाल्यामुळे मालमत्ता कर वसूली ठप्प आहे. पालिकेच्या मुदतठेवीही घटल्या आहेत. त्यातच पालिकेने राखीव निधीतून विकासकामांसाठी निधी वळवण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यामुळे पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाजही या अर्थसंकल्पातून येण्याची शक्यता आहे.

पालिकेची आर्थिक स्थिती कशीही असली तरी आधीच सुरू केलेल्या मोठ्या प्रकल्पांसाठी यावेळी पालिकेला भरीव तरतूद करावी लागणार आहे. सागरी किनारा मार्गाचा दुसरा टप्पा, तसेच गोरेगाव मुलुंड जोड रस्ता, समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करणे, अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी मोठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्त्पन्न वाढलेले नसले तरी भांडवली खर्चाच्या तरतुदी वाढवाव्या लागणार आहेत. त्याकरिता पुन्हा राखीव निधीलाच हात घालावा लागणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाचे आकारमान वाढणार हे निश्चित आहे.

पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा पहिलाच अर्थसंकल्प

पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. गगराणी हे पालिका आयुक्तपदी आल्यानंतर त्यांना आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात गगराणी यांनी पालिकेच्या कारभाराला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. अनेक खर्च कमी केले. तसेच प्रकल्प हे स्वावलंबी असतील या दृष्टीने नियोजन करण्याचे धोरण त्यांनी आखून दिले. प्रकल्पाचा देखभाल खर्च हा त्याच प्रकल्पातून पूर्ण होईल अशा रीतीने नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात याचेच प्रतिबिंब पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

निवडणूक अर्थसंकल्प?

चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना त्यात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील विविध घोषणाचा उल्लेख होता. चालू आर्थिक वर्ष हे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीने गाजले. या वर्षभरात पालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प देखील निवडणूक अर्थसंकल्प असण्याची शक्यता आहे. मालमत्ता करात वाढ करणे पालिका प्रशासनाला शक्य नसले तरी विविध पद्धतीने मालमत्ता कराच्या कक्षा वाढवल्या जाण्याची शक्यता आहे. झोपडपट्ट्यामधील व्यावसायिक गाळ्याप्रमाणेच अनेक बांधकामे मालमत्ता कराच्या कक्षेत येऊ शकतात.