मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतलेले रस्ते काँक्रीटीकरण, मेट्रो प्रकल्प, पर्जन्यवाहिन्यांची पुनर्बांधणी, विविध ठिकाणी सुरू असलेले रस्ते, पुलांची काम आदी विकासकामांचा थेट फटका मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना बसू लागला आहे. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असलेले कंत्राटदार आवश्यक खबरदारी घेत नसल्याने दररोज शहरात जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडत आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा ३९ टक्क्यांपर्यंत घटल्यामुळे राखीव साठ्याची मागणी पालिकेने केली आहे. तर दुसरीकडे जलवाहिन्या फुटल्यामुळे लाखो हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे अनेक भागातील नागरिकांना पाणीकपातीलाही तोंड द्यावे लागते आहे.

मुंबईचे रूप पालटण्यासाठी अनेक महिन्यांपासून महापालिका प्रशासनाने विविध विकासकामांवर भर दिला आहे. तसेच, खड्डेमुक्त मुंबईचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने शहर तसेच दोन्ही उपनगरांत सुरू असलेल्या रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामांनाही आता वेग देण्यात आला आहे. शिवाय मेट्रो प्रकल्पांनीही गती घेतली आहे. त्यामुळे जागोजागी रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार विकासकामे सुरू करण्यापूर्वी रस्त्याखालील जलवाहिन्यांचे योग्य सर्वेक्षण व मोजमाप करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. कंत्राटदारांच्या कामातील हलगर्जीपणामुळे रस्त्याखालील जलवाहिन्यांना धक्का लागून जलवाहिन्या फुटण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

मुंबईत डिसेंबर ते मार्च या कालावधीत जलवाहिनीला गळती लागल्याच्या सुमारे पाच मोठ्या घटना घडल्या आहेत. वांद्रे, रे रोड, मालाड, पवई, मुलुंड आदी ठिकाणी गळती लागलेल्या जलवाहिन्यांमुळे संबंधित परिसरातील नागरिकांना पाणीकपातीचा सामना करावा लागला. तसेच, जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी या भागातील पाणीपुरवठा काही १२ ते २४ तास बंद ठेवण्यात आला होता. महापालिकेला वाया गेलेल्या पाण्याची नेमकी नोंद करणे शक्य नसले तरीही या घटनांमधून हजारो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. अनेकदा जुनी जलवाहिनी बदलतानाही जलवाहिनीला गळती लागते. तसेच, जलवाहिन्या जीर्ण झाल्यानेही त्या फुटत असल्या तरी त्याचे प्रमाण कमी आहे.

वाहिन्या फुटणे नित्याचे

मुंबईत सुरू असलेल्या विकासकामांमुळे दररोज कुठे ना कुठे जलवाहिनी फुटण्याचे सत्र सुरू आहे. याबाबत महापालिकेकडे सातत्याने दररोज तक्रारी होतात. या जलवाहिन्यांची दुरुस्ती करताना पालिकेच्या जल अभियंता खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रशासनासाठी डोकेदुखी

जलवाहिन्या सातत्याने फुटण्याच्या घटनांमुळे अनेक भागांत पाणीकपातीचा सामना करावा लागतो. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडते. पालिका प्रशासनालाही आर्थिक भार सोसावा लागतो. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेचे लाखो रुपये खर्च होत असून कामगार, अधिकाऱ्यांसह प्रशासनावर मोठा ताण पडत आहे.

जलवाहिनी फुटण्याच्या चार महिन्यात पाच घटना

दिवस ठिकाण जलवाहिनीचे आकारमान
१० डिसेंबरवांद्रे पश्चिमेकडील लकी जंक्शन६०० मिमी व्यास
३० डिसेंबररे रोड, बिपीटी गोदामाजवळ६०० मिमी व्यास
२४ जानेवारीमालाड येथील लिबर्टी जलबोगदा१२०० मिमी व्यास
२८ फेब्रुवारीपवई व्हेंच्युरी१८०० मिमी व्यास
१७ मार्चमुलुंड पूर्व७५० मिमी व्यास