मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने शहभरातील वृक्षांच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फाद्यांची छाटणी सुरू केली आहे. मात्र, ही छाटणी अयोग्य पद्धतीने केली जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पूर्णपणे तोडण्यात येत आहेत. त्यामुळे झाडांचे नैसर्गिक संतुलन बिघडत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील, सार्वजनिक ठिकाणच्या आणि खासगी भूखंडावरील वृक्षांची छाटणी करण्यात येते. वृक्षांना कोणतीही हानी पोहोचू नये यासाठी त्यांची समतोल छाटणी करणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा झाडांची एकाच बाजूने अयोग्य पद्धतीने छाटणी करण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडतात. सध्या पालिकेकडून मुंबईत वृक्षछाटणी सुरू आहे. यादरम्यान केलेली वृक्षछाटणी अयोग्य प्रकारे केली असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. फक्त सुकलेल्या, धोकादायक फांद्या कापण्याऐवजी संपूर्ण झाड आक्रसून टाकण्यात येत आहे, असा आरोप स्थानिक तसेच पर्यावरणप्रेमी निमिश मलाडे यांनी केला आहे.
अनेकदा तक्रारी, सूचना करूनही दरवर्षी त्याच पद्धतीने वृक्षछाटणी केली जाते. छाटणीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात येत नाही, असेही ते म्हणाले. व- तज्ज्ञांची नेमणूक करून त्यांच्या उपस्थितीत वृक्षछाटणी करावी, त्यामुळे करून झाडांचे नुकसान होणार नाही, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले. दरम्यान, झाडाला योग्य आकार देण्यासाठी, तसेच फांद्यांची वाढ नियंत्रित करण्यासाठी झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यासंदर्भात महानगरपालिकेच्या उद्यान खात्यातर्फे कामगार व कर्मचाऱ्यांना यंदा विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. तरीही अयोग्य पद्धतीने वृक्षछाटणी कशी करण्यात येत आहे, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.
प्रात्यक्षिक दाखवल्यानंतरही चूका
उद्यान खात्याने आयोजित केलेल्या प्रशिक्षणात झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करणे, त्यासंदर्भातील योग्य पद्धती, अनावश्यक वृक्षतोड टाळणे याबाबत माहिती देण्यात आली. याचबरोबर वृक्षतज्ज्ञ विवेक राणे यांनी कर्मचाऱ्यांना थ्री कट पद्धत, कॅनोपी कपात याबाबत प्रातयक्षिक दाखविले. या कार्यशाळेत सर्व कंत्राटदार, उद्यानतज्ज्ञ, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ वृक्ष अधिकारी, सहाय्यक उद्यान अधीक्षक आदी उपस्ठित होते. यामुळे प्रात्यक्षिक दाखवल्यानंतरही या चुका कशा होऊ शकतात, असा मुद्दा पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित करण्यात येत आहे.
छाटणी करणे आवश्यक का
छाटणीमुळे झाडांना योग्य आकार देता येतो. फाद्यांची अनावश्यक वाढ थांबते. वृक्षछाटणी केल्यामुळे झाड पावसाळ्यात उन्मळून पडण्याची शक्यता कमी होते. तसेच मृत किंवा खराब झालेल्या फांद्या छाटल्याने रोग आणि किडींना प्रतिबंध करणे शक्य होते.
वृक्ष छाटणी न केल्यास संभाव्य धोके कोणते
– जुन्या, कमकुवत फांद्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तुटून रस्त्यावर, गाड्यांवर पडू शकतात.
– झाडांच्या फांद्या विजेच्या तारांमध्ये अडकल्यास शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते.
– झाडांच्या फांद्या इमारतींच्या भिंतींना टेकल्यास वाऱ्यामुळे संबंधित इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो.