मुंबई : यावर्षी गणेशोत्सवात घरगुती गणेशमूर्ती शाडूची माती किंवा पर्यावरणपूरक घटकांपासून घडविणे मुंबई महापालिकेकडून बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांना प्रत्येक विभागात एक जागा मोफत उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज एका विशेष बैठकीत दिले.
‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीवर बंदी घालण्याच्या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीना पर्यावरणपूरक पर्याय देण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याची घोषणा बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यामुळे सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, चार फूट उंच घरगुती गणेशमूर्ती शाडूची माती किंवा पर्यावरणपूरक घटकांपासूनच घडविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शाडूच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना जागेची कमतरता भासण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन मूर्तिकारांना अशा गणेशमूर्ती घडविण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक विभागात एक जागा मोफत उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
माती उपलब्ध करण्याचे आदेश ..
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने प्रायोगिक स्तरावर काही प्रमाणात शाडू माती उपलब्ध करून देण्याचेही निर्देश आयुक्तांकडून परिमंडळीय उपायुक्तांना देण्यात आले आहेत. यासाठी राज्यातील विविध भागातून किंवा आवश्यकता भासल्यास अन्य राज्यातून शाडूची माती आणून त्याचा मूर्तिकारांना पुरवठा करावा, असेही निर्देश परिमंडळीय सह आयुक्त, उपायुक्तांना देण्यात आले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठी आकारले जाणारे शुल्क व अनामत रक्कम माफ करण्याचाही निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त गणेशोत्सव मंडळांकडून घेतलेले शुल्क व अनामत रक्कम महानगरपालिकेकडे जमा आहे. ते त्यांना पुढील सात दिवसांमध्ये परत करण्याचेही निर्देश आयुक्त दिले.