मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पक्षांना याचा मोठा त्रास होत आहे. उकाड्यामुळे पक्षांना होणारा त्रास लक्षात घेऊन पालिकेच्या उद्यान विभागाने मुंबईतील ५०० हून अधिक उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. परिणामी, उद्यानांमध्ये येणाऱ्या पक्षांच्या संख्येतही वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबईतील तापमानात वाढीमुळे मुंबईकरांची काहीली झाली आहे. तसेच, पक्षांनाही उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. या पक्षांची तहान भागवण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने पुढाकार घेतला आहे. पालिकेच्या के पश्चिम विभागातील एकूण ५४ उद्यानांमध्ये पाण्याने भरलेली भांडी ठेवण्यात आली आहेत. तसेच, मुंबईतील इतर ५०० हून अधिक उद्यानांमध्येही ही सोय करण्यात आली आहे. पालिकेच्या या उपक्रमामुळे उद्यानात येणाऱ्या पक्षांच्या संख्येतही वाढ झाली आहे. तसेच, उद्यानांमध्ये ठेवण्यात आलेल्या भांड्यातील पाणी दिवसातून किमान तीन वेळा बदलले जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा…मुंबई : नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई
महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. मात्र, यंदा उपक्रमाची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून मार्चपासून हा उपक्रम सुरू केला आहे. मुंबईतील उद्यानांमध्ये पक्षांसाठी पाण्याची प्रत्येकी दोन भांडी ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.