मुंबई : महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्याचा पालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. मात्र निवडणूक कार्यालयाचा आडमुठेपणा त्यात अडसर ठरत आहे. पालिका शाळांतील १५ सभागृह व ७८ वर्गखोल्या निवडणूक कार्यालयाने ताब्यात घेतल्या आहेत. त्यात निवडणुकीचे साहित्य ठेवण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, परिपाठ, अन्य उपक्रमांसाठी शाळांमधील सभागृहाची गरज आहे. मात्र, शाळांतील सभागृहांचे गोदामात रूपांतर झाले आहे. काही शाळांमधील सभागृह गेल्या १४ वर्षांपासून बंद आहेत.
पालिकेच्या शाळांचा दर्जा, शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय स्तरावर अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षात विज्ञान पार्क, इंग्रजी भाषा प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात सुमारे १३ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मात्र, निवडणूक कार्यालयाने ताब्यात घेतलेले काही शाळांतील सभागृह परत मिळालेले नाही. धारावी टी. सी मराठी शाळा, वरळी सी फेस शाळा, सिटी ऑफ लॉस एंजेलिस, अभ्युदय नगर मनपा शाळा, न्यू शीव शाळा, ना. म. जोशी मनपा शाळा आदी शाळांचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्याही प्रचंड आहे. मात्र, सध्या या शाळांतील सभागृह व अनेक वर्गखोल्यांचा वापर विद्यार्थ्यांना करता येत नाही. काही वर्षांपूर्वी पालिकेने निवडणुकीच्या कामासाठी शाळांचे सभागृह निवडणूक कार्यालयाला तात्पुरत्या वापरासाठी दिले होते. मात्र, निवडणूक कार्यालयाने या जागांचा ताबा पालिकेला दिलेला नाही. निवडणूक कार्यालयाच्या या आडमुठेपणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात अडथळा निर्माण होत आहे.
वरळी सी फेस शाळेतील दोन्ही सभागृहांत निवडणूक कार्यालयाचे सामान आहे. ‘सिटी ऑफ लॉस एंजेलिस’ शाळेचेही दोन्ही सभागृह बंद आहेत. ‘न्यू शीव स्कूल’चे १ सभागृह आणि ५ वर्गखोल्यांवर निवडणूक कार्यालयाच्या ताब्यात आहेत, तर ना. म. जोशी शाळेतील दोन्ही सभागृह २०२० सालापासून बंद आहेत. तसेच, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील काही शाळांतील सभागृहात अनेक वर्षांपासून निवडणूक कार्यालयाचे सामान पडून आहे. पालिकेचे विविध उपक्रम, कार्यक्रम, परिपाठ, शाळेचे स्वतंत्र सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शाळांकडे सभागृह नसल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शाळांना विविध कार्यक्रम वर्गखोल्या व मैदानात आयोजित करावे लागत आहेत. वर्गखोल्या मोकळ्या करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने अनेक वेळा प्रयत्न केल्याची माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.
पुनर्बांधणीत अडथळा
धारावीतील न्यू शीव शाळेत सुमारे नऊ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेची इमारत जुनी झाल्याने पालिकेने पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. मात्र, शाळेतील एक सभागृह आणि ५ वर्गखोल्यांमध्ये २०१२ पासून निवडणूक कार्यालयाचे सामान असल्याने पुनर्बांधणीत महापालिकेला अडथळा येत आहे. दोन वर्ग एकत्र बसवून टप्प्याटप्प्याने बांधकाम पूर्ण करण्याची कसरत पालिकेचा शिक्षण विभाग करत आहे.
शाळा बंद (वर्ष)
धारावी टी. सी मराठी शाळा – २०१२
न्यू सायन स्कूल – २०१२
वरळी सी फेस शाळा – २०२०
सिटी ऑफ लॉस एंजेलिस – २०२०
ना. म जोशी शाळा – २०२०