लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने नुकतीच ‘फेरीवालामुक्त परिसर’ मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकांनी मागील सात दिवसांत मुंबईतील विविध भागात कारवाईचा बडगा उगारला. दरम्यान, अनधिकृत फेरीवाल्यांकडील सुमारे २ हजार ७६३ साधनसामग्री जप्त करण्यात आली. त्यात ५४४ चारचाकी हातगाड्या, ९६८ घरगुती गॅस सिलिंडर आणि १ हजार २५१ अन्य प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिका हद्दीतील वर्दळीची २० ठिकाणे फेरीवालामुक्त करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मुंबईकरांना पदपथ आणि रस्त्यांवरून जाता-येताना अडथळा ठरणाऱ्या, तसेच उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात महानगरपालिकेमार्फत सातत्याने कारवाई केली जात आहे. अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर करावी, असे आदेश महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महानगरपालिका प्रशासन आणि मुंबई पोलीस प्रशासनाची संयुक्त कार्यवाही सुरू आहे.
मुंबईतील विविध विभागांमध्ये १७ ते २४ जानेवारी २०२५ या सात दिवसात करण्यात आलेल्या कारवाईत चारचाकी हातगाड्या, सिलिंडर आणि स्टोव्ह, शेगडी, बाकडे, शॉरमा मशीन्स आदी जप्त करण्यात आले. नियमित कार्यालयीन वेळेखेरीज, दुपारी २ ते रात्री १० या कालावधीत दररोज ही अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाई पुढेही सुरूच राहील, असे उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव यांनी सांगितले.
जप्त साधनांची एकूण संख्या – २ हजार ७६३
चारचाकी हातगाड्या – ५४४
सिलिंडर – ९६८
स्टोव्ह, शेगडी, तवा, कढई, लोखंडी बाकडे आदी विविध प्रकारचे साहित्य – १ हजार २५१