मुंबई : शिवाजी पार्क येथे दगडाने ठेचून ४० वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने शिवाजी पार्क पोलिसांनी मनोज अमित सहारे ऊर्फ मन्या (३०) या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दारूच्या नशेत आरोपीने हा प्रकार केल्याचे चौकशीत सांगितले आहे. पोलीस त्या दाव्याची पडताळणी करत आहेत.
शिवाजी पार्क येथील रुक्मिणी सदन इमारतीच्या पदपथावर शुक्रवारी बेवारस मृतदेह सापडला होता. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली. प्राथमिक तपासणीत मृत व्यक्तीच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवाजी पार्क पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता मृत व्यक्तीचे नाव चंदन असल्याचे समजले.
हेही वाचा – मजुरांच्या माध्यमातून २ हजारांच्या नोटा बदलवण्याचे रॅकेट, ‘दिल्ली ‘कनेक्शन’
हेही वाचा – राज्यातील हवामानात येत्या २४ तासात मोठे बदल
सीसीटीव्हीच्या तपासणीत मृत व्यक्ती चंदनसोबत एक तरुण व्यक्ती दिसला. मृत व्यक्तीसोबत असणाऱ्या तरुणाचे नाव मनोज सहारे ऊर्फ मन्या असून तो कचरा वेचण्याचे काम करत असल्याचे पोलिसांना समजले. शोध घेतला असता माहीम येथील मनमाला मंदिराजवळ सीसीटीव्ही चित्रीकरणातील व्यक्तीशी साधर्म्य असलेला व्यक्ती सापडला. त्याला नाव विचारले असता त्याने आपले नाव मनोज सहारे असल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी मनोज हा शिवाजी पार्क येथील बंगाल क्लब येथील पदपथावर राहतो. आरोपीने दगडाने ठेचून चंदनची हत्या केली. हत्येत वापरलेला दगड पोलिसांनी हस्तगत केला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.