मुंबई : झोपमोड केल्यामुळे संतप्त झालेल्या मुलाने ७८ वर्षीय आईवर सुरीने हल्ला करून तिची हत्या केल्याचा गंभीर प्रकार ग्रँटरोड परिसरात घडला. याप्रकरणी आरोपी सुभाष वाघ (६४) याला डी.बी. मार्ग पोलिसांनी अटक केली.
आरोपीने आईच्या मानेवर, छातीवर व हातावर सुरीने वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत रमाबाई नथू पिसाळ (७८) असे मृत महिलेचे नाव असून त्या ग्रँट रोड येथील पंडितालय इमारतीत वास्तव्यास होत्या. आरोपी सुभाष वाघ आईसोबत राहत होता. सुभाषला सकाळी पाणी भरण्यासाठी लवकर उठावे लागत असल्यामुळे तो रात्री लवकर झोपयचा. त्यावेळी त्याची आई रमाबाई काम करत असल्यामुळे त्याची झोप मोड व्हायची. त्यातून त्यांच्यात अनेक वेळा वाद झाले. दोघांमध्ये मंगळवारी याच कारणामुळे वाद झाला. त्यातून आरोपीने भाजी कापण्याचा सुरीने आईच्या मानेवर, छातीवर, हातावर वार केले. रमाबाई यांना जे.जे. रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी रमाबाई यांचा नातू व आरोपी सुभाषचा पुतण्या वेदाक्ष वाघ याच्या तक्रारीवरून डी. बी. मार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.