मुंबई : मुंबई – नागपूर समृद्धी लहामार्गातील शिर्डी – भरवीर ८० किमी लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण झाले असून हा ८० किमीचा टप्पा मेमध्ये वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी म्हाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सुरू केली आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास शिर्डी – भरवीर अंतर ४०-४५ मिनिटात पार करता येणार आहे. तर भरवीर – नागपूर अंतर सहा तासात पार करणे शक्य होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमएसआरडीसीने ७०१ किमी लांबीच्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू असून या ७०१ किमी मार्गापैकी ५२० किमी मार्ग डिसेंबर २०२२ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या मार्गामुळे नागपूर – शिर्डी अंतर केवळ पाच तासांत पार करता येत आहे. मे महिन्यात शिर्डी – भरवीर हा ८० किमीचा टप्पा सुरू होणार आहे. या टप्प्याचे बांधकाम १०० टक्के पूर्ण झाले आहे, अशी माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

शिर्डी – भरवीर टप्प्याचे काम मार्चमध्ये पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे एमएसआरडीसीने जाहीर केले होते. मात्र काही कारणाने कामास विलंब झाला आहे. पण आता काम पूर्ण झाले असून हा टप्पा मेमध्ये वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन एमएसआरडीसी करीत आहे. शिर्डी – भरवीरदरम्यानच्या ८० किमीच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे, असे एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी  सांगितले. तर हा टप्पा मेमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे, पण यासाठीची तारीख अद्याप निश्चित झाली नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर जुलैपर्यंत भरवीर – इगतपुरी टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. या टप्प्याचे कामही सध्या वेगात सुरू आहे.