मुंबई : नागपूर ते मुंबई अंतर अवघ्या आठ तासांत पूर्ण करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून बांधण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाला आज, बुधवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधी महामार्गावरून एक कोटी ५२ लाख वाहने धावली असून यातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) ११०२ कोटी रुपये महसूल मिळाला. मात्र त्याचवेळी १४० अपघातांमध्ये २३३ प्रवाशांचा मृत्यू गेल्या दोन वर्षांत झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

७०१ किमी लांबीच्या या महामार्गावर नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमी महामार्ग सेवेत दाखल झाला आहे. नागपूर ते शिर्डी या ५२० किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते.

हेही वाचा : अनौपचारिक कौशल्ये, कामाच्या अनुभवाधारे कोणालाही पदवी

या कालावधीत वाहनांची संख्या समाधानकारक असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. डिसेंबर २०२२ ते डिसेंबर २०२४ या दोन वर्षांच्या कालावधीत नागपूर – इगतपुरी या टप्प्यात एक कोटी ५२ लाख वाहने धावली. यापैकी एक कोटी ५ लाख हलकी वाहने, पाच लाख ४ हजार व्यावसायिक हलकी वाहने आणि ४२ लाख १६ हजार अवजड वाहने आहेत. आगामी काळात वाहनांच्या संखेत वाढ होईल, अशी अपेक्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी

अतिवेगावर नियंत्रणाचे आव्हान

दोन वर्षांत महामार्गावर २३३ जणांना प्राण गमावावे लागले आहेत. अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस नियमित कारवाई करीत असून महामार्गालगत रंगीत झाडे, चित्रे, शिल्पे लावण्यात आली आहेत. तसेच वाहतूक पोलिसांकडूनही वाहनचालकांचे नियमितपणे समूपदेशन केले जाते. इतरही अनेक उपाययोजना करण्यात आल्या असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai nagpur samruddhi expressway 233 deaths in 140 accidents within last two years css