पूर्व मुक्त मार्गाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा. म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितला. पण प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील प्रकल्पासाठी सरकार करत असलेले काम, रेसकोर्सवरील ‘थीमपार्क’, सागरी सेतू अशा विविध मुद्दय़ांवर जोरदार फटकेबाजी करत कार्यक्रमात आगामी निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली. मुंबईत मोकळय़ा जागा असल्याच पाहिजेत, अशी आग्रही भूमिका मांडत अजितदादांनी शिवसेनेचाही समाचार घेतला.
मुक्त मार्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. अजित पवारही यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री चव्हाण हे किनारपट्टी रस्त्याचे समर्थक आहेत. सागरी सेतूंना त्यांचा विरोध आहे. या पाश्र्वभूमीवर पूर्व मुक्त मार्गानंतर आता मुंबईसाठी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू व इतर प्रकल्प येणार आहेत. वांद्रे-वरळी सागरी सेतूचे पुढचे टप्पेही प्रलंबित आहेत. त्यांचे कामही हाती घ्यावे, असे मुंबईतील लोकप्रतिनिधींचे मत आहे. ते काम मार्गी लागले पाहिजे, असे नमूद करत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या मर्मावर बोट ठेवले. मुंबईच्या प्रकल्पांसाठी ६८ हजार कोटी रुपये लागणार आहेत. तर राज्याच्या ग्रामीण भागातील प्रकल्पांसाठी ६० हजार कोटी रुपये लागणार आहेत. याबाबत नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अहलुवालिया यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगत मुंबई व राज्याच्या विकास प्रकल्पांसाठी सरकार कशारितीने काम करत आहे याचा पाढा अजितदादांनी वाचला.
मुंबईकरांना, बाहेरून येणाऱ्यांना व जाणाऱ्यांना या प्रकल्पाचा लाभ होईल. पण मुंबईसाठी प्रकल्प राबवत असताना त्यांची उपयुक्तताही तपासली पाहिजे. नाहीतर स्कायवॉकसारख्या निरुपयोगी प्रकल्पांवर कोटय़वधींचा खर्च होईल. गप्पा मारण्याचे, व्यायामासाठी फिरण्याचे ते ठिकाण झाले आहे, असे टोले अजित पवारांनी
लगावले.
शिवसेनेने महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क उभारण्याच्या स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाचाही अजितदादांनी समचार घेतला. तसेच महानगरपालिकेची जवळपास २५० उद्याने आहेत. आधी ती नीट करा, जिजामाता उद्यानाची काय अवस्था झाली आहे ते पाहा, अशी सूचना महानगरपालिकेचे आयुक्त कुंटे यांना करत अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला फटके मारले.

काँग्रेस-राष्ट्रवादीतील  विसंवाद पुन्हा उघड
भाषणात अजितदादांनी सागरी सेतू प्रकल्प हाती घेण्याची गरज व्यक्त केली. तर पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना मुंबईतील किनारपट्टी रस्त्याच्या प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण खात्याशी चर्चा सुरू आहे. लवकरच पर्यावरण मंत्री मुंबईत येणार आहेत, त्यावेळी हा विषय उपस्थित केला जाईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी किनारपट्टी रस्त्याच्या समर्थनार्थ किल्ला लढवला. अजित पवारांनी सागरी सेतूचा पुरस्कार केल्याबद्दल विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रकल्प करायचे आहेत, असे सांगत मुद्दा गुंडाळला.