मुंबई : ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीला नौदलाच्या ‘स्पीड बोट’ने धडक दिल्याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असून तज्ज्ञांच्या मदतीने अपघातग्रस्त बोटीची तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय याप्रकरणी नौदलाशीही पत्र व्यवहार करण्यात येणार आहेत. पोलिसांनी तक्रारदारासह १० जणांचे जबाब नोंदवले असून त्यात इतर प्रवाशांचाही समावेश आहे. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नौदलाच्या स्पीड बोटीचा चालक आणि इतर संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणामुळे १३ जणांच्या मृत्यूला कारभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘नीलकमल’ प्रवासी बोट बुधवारी दुपारी पर्यटक आणि प्रवाशांना घेऊन घारापुरीला जात होती. नौदलाच्या एका ‘स्पीड बोटी’ने दुपारी ३.५५ च्या सुमारास प्रवासी बोटीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यामुळे ‘नीलकमल’ बोटीला भगदाड पडले. त्यातून पाणी आत शिरल्यामुळे बोट बुडू लागली. अपघाताची माहिती मिळताच नौदल, तटरक्षक दल व मुंबई सागरी पोलिसांच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नौदलाच्या ११ नौका, तटरक्षक दलाची एक व यलोगेट पोलीस ठाण्याच्या ३ नौका, तसेच स्थानिक मच्छीमार नौकांच्या सहाय्याने मदतकार्य सुरू करण्यात आले. नौदलाच्या चार हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली. दोन्ही बोटींवर प्रवासी आणि कर्मचारी अशा एकूण ११५ जणांना बचाव कार्यात बाचवण्यात आले. मात्र यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला असून त्यातील आठ जणांचे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.
हे ही वाचा… मुंबईबाहेर रुजू न झाल्याने १५ पोलिसांना कार्यमुक्त करण्यास नकार, पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आदेश जारी
हे ही वाचा… नीलकमल बोट अपघात : प्रवासी बोटीवरील लहान मुलासह दोघेजण अद्याप बेपत्ता, नौदल, तटरक्षक दलाकडून शोध सुरू
जखमींपैकी जेएनपीटी रुग्णालयात ७५, नेव्हल डॉकयार्डमध्ये २५, अश्विनी रुग्णालयात एक, सेंट जॉर्जमध्ये नऊ, करंजे येथे १२, तर मोरा रुग्णालयात १० जणांना दाखल करण्यात आले आहे. नीलकमल बोटीवरील पाच कर्मचारी सुखरुप असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. पण या संपूर्ण अपघातात अद्याप दोन प्रवासी बेपत्ता असून त्यात एक पुरूष व लहान मुलाचा समावेश आहे. त्याच्या शोध घेण्यासाठी तटरक्षक दलाच्या बोटी व हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. अपघात वाचलेले नाथाराम चौधरी (वय २२ वर्षे, राहणार साकीनाका, मुंबई) यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), १२५ (अ) (ब), २८२, ३२४ (३)(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असून तक्रारदारासह १० जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. अपघातग्रास्त ‘नीलकमल’ बोटीची तज्ज्ञांमार्फत तपासणीही करण्यात येणार आहे. त्यात मेरिटाईम बोर्डाचीही मदत घेण्यात येणार आहे. याशिवाय नौदलाकडूनही याप्रकरणी तपासणी करण्यात येणार आहे. पोलिस नौदलाच्या संपर्कात असून त्यांच्याकडून मदत घेण्यात येत आहे.