मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त नागरिक मोठ्या संख्येने नातेवाईक आणि मंत्रमंडळींना भेटण्यासाठी जातात. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील नेरळ स्थानक येथे रविवारी घेतलेला विशेष ब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे आता या मार्गावर प्रवाशांना विनाअडथळा प्रवास करता येणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील नेरळ स्थानक येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी रविवारी विशेष ब्लॉक घेण्याचे नियोजन होते. या ब्लाॅकमुळे लांबपल्ल्यांच्या रेल्वेगाड्या आणि लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. अनेक लोकल सेवा अंशत:, तर काही पूर्णत: रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच ब्लाॅकमुळे बदलापूर – कर्जत स्थानकांदरम्यानची लोकल सेवा बंद राहणार होती. परंतु, रविवारी गुढीपाडवा असून ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होणार होते. ही बाब लक्षात घेऊन नेरळ येथील ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. नेरळ येथील पायाभूत कामे पुढे ढकलण्यात आली आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.