मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडतात. यानिमित्त हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात येते. ही संधी साधून निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थाचा पुरवठा होऊ नये, तसेच अन्न विषबाधा होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबवर करडी नजर ठेवणार आहे. याच पार्श्वभूमीवर ५ ते ३१ डिसेंबरदरम्यान मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबमध्ये विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
नागरिकांना सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन नेहमीच सतर्क असते. ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात व जल्लोषात केले जाते. यावेळी हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात येते. या पार्टीमध्ये खाद्यपदार्थांचा पुरवठा करण्यात येतो. तसेच नागरिकांकडूनही मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांना मागणी असते. ही बाब लक्षात घेऊन हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लब चालवणाऱ्या खाद्यपदार्थ पुरवठादार व्यावसायिकाकडून निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांचा पुरवठा होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे विषबाधेसारखी घटना घडण्याची शक्यता असते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांना निर्भेळ, सकस व गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब आणि उपहारगृह या आस्थापनांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी दिली.
या मोहिमेदरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब आणि उपहारगृह या आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व त्याअंतर्गत नियम व नियमांचे काटेकोरपणे पालन होते किंवा नाही याबाबत खातरजमा करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील तरतुदींनुसार सक्त कारवाई करण्याचे निर्देश सर्व सहायक आयुक्त (अन्न) व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असेही माने यांनी सांगितले.
हेही वाचा – दहा टक्के पाणीकपात मागे, मुंबईसह ठाणे व भिवंडीकरांना दिलासा
तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक
अन्नपदार्थांची गुणवत्ता व दर्जाबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याची सविस्तर तक्रार प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबईचे सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी नागरिकांना केले आहे.