बसमधून प्रवास करणाऱ्या १३ वर्षीय मुलीला सेक्सबद्दल प्रश्न विचारणाऱ्या कंडक्टरला आता तुरूंगाची हवा खावी लागणार आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीला या कंडक्टरने प्रवासादरम्यान सेक्सबद्दल माहिती आहे का?, अशी विचारणा केली होती. या प्रकरणी मुंबईतील एका विशेष न्यायालयाने बस कंडक्टर चंद्रकांत सुदाम कोळी याला पोक्सो कायद्यातंर्गत दोषी ठरवत एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. त्याचबरोबर आरोपीला १५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
साल २०१८ मध्ये मुंबई उपनगरात ही घटना घडली होती. १३ वर्षीय मुलगी दररोज मुंबईतील बेस्ट बसमधून शाळेत ये-जा करायची. जुलै २०१८ रोजी मुलगी शाळेतून घरी निघाली होती. यावेळी बसमधून २ ते ३ लोकच प्रवास करत होते. यावेळी कंडक्टर चंद्रकांत कोळी तिच्याजवळ जाऊन बसला. त्यानंतर त्याने मुलीला ‘तुला सेक्सबद्दल माहिती आहे का?’, असा प्रश्न केला. कंडक्टरच्या या प्रश्नावर मुलीने माझ्याशी बोलू नका, असं उत्तर दिलं. त्यानंतर कंडक्टर कोळी उठून गेला.
हेही वाचा- गुलशन कुमार हत्याप्रकरण, दोषी आरोपीची शरणागती
थोड्या वेळाने पुन्हा तो त्या मुलीजवळ आला आणि त्याने पुन्हा सेक्सबद्दल तिला प्रश्न विचारला. त्यावर मुलीने असले प्रश्न विचारू नका, असं उत्तर दिलं. त्यानंतर मुलीचा बस स्टॉप आला आणि ती बसमधून उतरली. हा प्रसगं घडल्याच्या काही दिवसानंतर मुलीने शाळेत जाण्यासच नकार दिला. त्यावेळी मुलीच्या आईने तिला कारण विचारलं. त्यावर तिने काहीच उत्तर दिलं नाही. त्यानंतर तिच्या आईने मुलीच्या मैत्रिणींना विचारलं, त्यानंतर हा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आई मुलीला बस डेपोमध्ये घेऊन गेली. तिथे मुलीने बस कंडक्टर कोळीला ओळखलं. त्यानंतर आईच्या तक्रारीवर कंडक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच पोलिसांनी कोळीला अटकही केलं होतं.
हेही वाचा- मोबाइल चोराला पकडण्याच्या प्रयत्नात लोकलमधून पडून महिला जखमी
या प्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने कोळीला दोषी ठरवलं. पोक्सो कायद्यातील कलम १२ नुसार त्याला दोषी ठरवण्यात आलं असून, न्यायालयाने त्याला एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसंच १५ हजार दंडही ठोठावला आहे. १५ हजार दंड न भरल्यास तीन महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.