Latest News in Mumbai : घडाळ्याच्या काट्याप्रमाणे वेगवान असलेल्या मुंबईतील राजकीय, गुन्हे, वाहतूक, आर्थिक, महानगरपालिका, आरोग्य, हवामान, गुन्हे, खेळ अशा विविध क्षेत्राशी संबंधित घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून घेता येईल.
फलाट तिकीट विक्री बंद
मुंबई : होळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी नियमित रेल्वेगाड्यांसह, विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. परंतु, प्रवाशांना स्थानकापर्यंत सोडण्यासाठी येणारे कुटुंबीय, नातेवाईक यांची रेल्वे स्थानकात गर्दी होते. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे सुरक्षा व्यवस्थेला कठीण जाते.
मद्य दुकानांसाठी गृहनिर्माण सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक
मुंबई: राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा मद्याचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक राहील. सोसायटीच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’शिवाय नवीन बियर शॉपी किंवा दारु दुकान सुरु करता येणार नाही. तसेच मद्यविक्रीचे दुकान बंद करण्यासाठी ५० टक्के मतदानाची अट रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
अत्यवस्थ रुग्ण २४ तास उपचाराविना… शीव रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस
मुंबई : ‘खासगी रुग्णालयातील रुग्णांना दाखल करून घ्यायचे नाही’ अशी आडमुठी भूमिका घेत शीव रुग्णालयातील ट्रॉमा केअरमधील डॉक्टरने सोलापूरहून गंभीर अवस्थेत आणलेल्या ८७ वर्षीय रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे तब्बल २४ तास स्ट्रेचरवरच असलेला रुग्ण उपचाराची वाट पाहत होता. उपचारासाठी नातेवाईक विनवण्या करीत होते, मात्र डॉक्टराला पाझर फुटला नाही.
न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटींचा अपहारः महाव्यवस्थापकाची अडीच तास पॉलिग्राफी चाचणी
मुंबई : ‘न्यू इंडिया को ऑप बँके’तील १२२ कोटी रुपयांच्या अपहारातील मुख्य आरोपी व बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहता याची मंगळवारी सुमारे अडीच तास पॉलिग्राफी चाचणी करण्यात आली. तपासाच्या दृष्टीने ही चाचणी महत्त्वाची मानली जाते. व्यवस्थापक म्हणून मेहताला या गैरव्यवहाराची संपूर्ण माहिती आहे.
होळीदरम्यान वृक्षतोड केल्यास पाच हजार रुपये दंड; मदत क्रमांक १९१६ वर तक्रार करण्याचे आवाहन
मुंबई : होळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये. अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास त्याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात येईल, तसेच संबंधितांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. अनधिकृतपणे वृक्षतोड केल्यास एक ते पाच हजार रुपये दंड करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
मुंबई: दुकानदारांना गुटखा पुरवणारा अटकेत
मुंबई: राज्यात गुटखा बंदी असताना दुकानदरांना गुटखा पुरवणाऱ्या एका आरोपीला कुर्ला पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी सहा हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.कुर्ला (प.) येथील टाकियावाडी परिसरात एक इसम मोठ्या प्रमाणात गुटखा घेऊन येणार असल्याची माहिती कुर्ला पोलिसांना मिळाली. त्यानुसार कुर्ला पोलिसांनी सोमवारी सकाळी परिसरात सापळा रचला. याच वेळी आरोपी तेथे आला. आरोपी दिसताच पोलिसांनी त्याला झडप घालून ताब्यात घेतले. त्याच्याकडे आसलेल्या गोणीची पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये बंदी असलेला विविध कंपन्यांचा गुटखा सापडला. कुर्ला पोलिसांनी आरोपी मोहम्मद जाहिदला अटक केली असून तो गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरातील दुकानदारांना गुटख्याची विक्री करीत असल्याचे तपासात समोर आले आहे.
सागरी किनारा मार्गाचा विस्तार : अडसर ठरणाऱ्या झाडांसाठी सुधारित आराखड्याची मागणी
सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा – दहिसर मार्गाच्या विस्तारासाठी कांदिवलीमधील चारकोप सेक्टर ८ परिसरातील ३०० हून अधिक झाडे तोडण्यास स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला.
आर्थिकदृष्ट्या आरोग्य विभागाचे ‘मानसिक खच्चीकरण’! अर्थसंकल्पातील अपुऱ्या तरतुदीमुळे डॉक्टरांमध्ये नाराजी…
मुंबई: अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण तसेच शेतकऱ्यांबरोबरच आरोग्य विभागही उपेक्षित राहिला असून आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार आर्थसंकल्पातील तरतुदीचा विचार करता आरोग्य विभागाची वाटचाल कुपोषणाकडून तीव्र कुपोषणाच्या दिशेने सुरु झाली आहे.
बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडला
मुंबई : आणिक बस आगाराच्या शेजारी एका व्यक्तीचा मतदेह सापडला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून मृत व्यक्ती गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता होती. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.प्रतीक्षा नगर येथील आणिक आगाराजवळ मृतदेह सापडला. याबातची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक वडाळा टीटी पोलीस व अग्निशमन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले. मृत्यू व्यक्ती ५० वयोगटातील असून तो गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता होता. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
बीकेसी – कफ परेड मेट्रो ३ मार्गिकेचे ९३ टक्के काम पूर्ण
मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून बीकेसी – कफ परेडदरम्यानच्या टप्प्याचे ९३ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) देण्यात आली आहे. आरे – बीकेसीदरम्यानचा टप्पा १ वाहतूक सेवेत दाखल झाला असून बीकेसी – कफ परेड टप्प्यातील बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा लवकरच वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे.
मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग मिसिंग लिंकचे ९३ टक्के काम पूर्ण
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली – कुसगावदरम्यान १९.८० किमी लांबीच्या नवीन मार्गिकेचे (मिसिंग लिंक) काम हाती घेतले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ९३ टक्के काम पूर्ण झाले असून आता कामाला वेग देण्यात आला आहे.
जिल्हा निवासी कार्यक्रमांतर्गत जी.टी. रुग्णालयाला मिळणार ७० निवासी डॉक्टर
मुंबई : जी.टी. रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुपांतर झाल्यानंतर वैद्यकीय सेवांमध्ये हळूहळू वाढ करण्यात येत आहे. मात्र वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आवश्यक असणारे डॉक्टर उपलब्ध करण्यात समस्या निर्माण होत होत्या. मात्र जिल्हा निवासी कार्यक्रमांतर्गत जी. टी. रुग्णालयाला ७० निवासी डॉक्टर उपलब्ध होणार आहेत.
पत्रकार कोरटकर यांच्या अटकपूर्व जामिनावर नव्याने सुनावणी घ्या, उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सत्र न्यायालयाला आदेश
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेले नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी कोल्हापूर येथील सत्र न्यायालयाला दिले.
सविस्तर वाचा
देशभरात ज्येष्ठ नागरिकांसाठी फक्त २१ हजार घरांची निर्मिती! नाशिकमधील विकासकांच्या परिषदेतील सूर
देशभरात ज्येष्ठ नागरिकांसाठी फक्त २१ हजार घरांची निर्मिती झाली आहे. त्यातही ६२ टक्के घरे दक्षिण भारतात असून कोईम्तूर, चेन्नई आणि बंगळुरु या शहरांनी यापैकी ४० टक्के वाटा उचलला आहे. सविस्तर वाचा
महारेलने दोन वर्षांत केली ३२ रेल्वे उड्डाणपुलांची बांधणी
मुंबई : महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकरण आणि दळणवळण अधिक सुकर करण्यासाठी महारेलने (एमआरआयडीसी) विविध योजना आखल्या जात आहेत. विशेष म्हणजे महारेलने अवघ्या दोन वर्षात संपूर्ण राज्यभरात ३२ रेल्वे उड्डाणपुलांची बांधणी करून ते नागरिकांच्या सेवेत उपल्बध करण्याची कामगिरी केली आहे.
मुंबई : गॅसवाहिनीच्या दुर्घटनेतील एकाचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर, कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल
मुंबई : अंधेरी येथील तक्षशिला परिसरातील शेर – ए- पंजाब सोसायटीजवळ शनिवारी मध्यरात्री फुटलेल्या गॅसवाहिनीच्या दुर्घटनेतील एका रुग्णाचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यू झाला.
भांडणानंतर २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, दोन तरुणांना अटक
मुंबई : चेंबूर परिसरात चाकूने वार करून २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दोन तरुणांना मंगळवारी अटक केली. मृत तरुण आणि आरोपी एकाच परिसरात वास्तव्यास असून किरकोळ भांडणानंतर आरोपींनी तरुणावर चाकूने हल्ला केला. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुंबई : एमएमआरडीएविरोधातील याचिका सिस्ट्राकडून मागे, दोन्ही पक्षांत चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय
मुंबई : कंत्राटाला मुदतवाढ देण्यास नकार देणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरुद्धची याचिका फ्रेंच कंपनी सिस्ट्राने सोमवारी मागे घेतली.
पत्रकार कोरटकर तपासात सहकार्य करत नाही; अटकपूर्व जामीन रद्द करा, राज्य सरकारची उच्च न्यायालयात धाव
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेले नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर यांना कोल्हापूर येथील कनिष्ठ न्यायालयाने मंजूर केलेला अटकपूर्व जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.