Latest News in Mumbai Today Live : देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर हे स्वप्ननगरी म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोज लाखोंच्या संख्येने लोक या शहरात येत असतात आणि वाढत्या लोकसंख्येबरोबरच शहरात वेगवेगळ्या नागरी समस्याही भेडसावत असतात. वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, प्रदुषण, गुन्हेगारी, मुंबई लोकलमधील वाढती गर्दी या नागरी समस्यांचा रोज सर्वांना समाना करावा लागत आहे. तर या आणि अशा सर्व महत्त्वाच्या घडमोडींविषयी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात…
Mumbai Maharashtra News LIVE Today, 2 April 2025
किरकोळ वादातून घर जाळले
मुंबई: खुर्चीवर बसण्यावरून झालेल्या वादातून सराईत आरोपीने महिलेच्या घरावर पेट्रोल ओतून घर जाळल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी आरोपीने महिलेसह शेजाऱ्यांनाही धमकावले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला बोरीवली पोलिसांनी अटक केली आहे.
तक्रारदार लक्ष्मी प्रभाकर बोणताला, वय-३४ वर्षे या बोरीवलीतील गोराई परिसरातील भीमनगर परिसरात राहतात. त्या घरकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचा ३१ मार्च रोजी खुर्चीवर बसण्यावरून लक्ष्मी व आरोपी विशाल उदगले ऊर्फ जंगली याच्याशी वाद झाला. विशाल याने सुरूवातीला लक्ष्मी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर तो दगड घेऊन आला. त्यामुळे तक्रारदार घाबरल्या. याप्रकारानंतरही आरोपी थांबला नाही. तो मंगळवारी (१एप्रिल) पहाटे पेट्रोल घेऊन आला व महिलेच्या घर क्रमांक ५६ च्या दरवाज्यावर पेट्रोल ओतून आग लावून दिली. यावेळी शेजारी धावून आले असता आरोपीने त्यांनाही धमकावले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने तात्काळ आग विझवण्यात आली. पण या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण होते.
घडलेल्या प्रकारानंतर तक्रारदार महिला लक्ष्मी यांनी तात्काळ बोरीवली पोलीस ठाणे गाठून आरोपी विशाल विरोधात तक्रार केली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ७९,३५१(२),११५(२),३२६(ग), १३१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विशाल उदमले उर्फ जंगली याला याप्रकरणी अटक केली. अटकेनंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी बोरीवली पोलीस अधिक तपास करत आहेत.
नंदुरबार, बीड जिल्ह्यांना जलसंपदा विभागाचा दिलासा
मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नागन मध्यम प्रकल्पाच्या १६१ कोटी १२ लाख रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
राज्यभरात पाऊस, गारपिटीचा जोर; जाणून घ्या हवामान विभागाचा जिल्हानिहाय इशारा
मुंबई : राज्याच्या बहुतांश भागात बुधवारी उन्हाळी पाऊस आणि गारपिटीचा जोर राहणार आहे. अकरा जिल्ह्यांना नारंगी तर उर्वरीत जिल्ह्यांना पिवळा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारपासून पाऊस आणि गारपिटीचा जोर कमी होणार आहे.
‘रोहयो’ मजुरांचे कोट्यवधी रुपये केंद्र सरकारकडे थकले; नेमकी किती कोटी रुपयांची मजुरी थकली?
मुंबई : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काम केलेल्या मजुरांची सुमारे १२०० कोटी रुपयांची मजुरी केद्र सरकारकडे थकली आहे. जानेवारी महिन्यापासून केंद्र सरकारकडून अपेक्षित असणारी मजुरांना देय असलेल्या मजुरीचे पैसे न आल्यामुळे मजुरांची आर्थिक कोंडी झाली आहे.