Latest News in Mumbai Today : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सुमारे ३० कोटी रुपये खर्चून सिंगापूर येथे विकसित ‘ट्री टॉप वॉक’ या संकल्पनेशी साधर्म्य असलेला निसर्ग उन्नत मार्ग मलबार हिल इथे फिरोजशहा मेहता उद्यान आणि कमला नेहरू उद्यान या ठिकाणी विकसित केला आहे. तर दुसरीकडे मुंबईतील रस्ते यापुढे दिवसातून दोन वेळा स्वच्छ करण्यात येणार आहेत. सकाळी आणि संध्याकाळी रस्ते स्वच्छ करण्यासाठी पालिकेचा घनकचरा विभाग नियोजन करीत आहे. तेव्हा मुंबईतील अशा विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून घेता येईल.
Mumbai Maharashtra News Today, 31 march 2025
मोबाइल चोरणाऱ्या सराईत आरोपींना अटक
मुंबई : भरधाव वेगात दुचाकीवरून येऊन पादचाऱ्यांच्या हातातून मोबाइल हिसकावून पळवणाऱ्या दोन सराईत आरोपीना मुलुंड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून मोबाइल आणि एक दुचाकी हस्तगत केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुलुंडमधील मलबार हिल रोड परिसरात राहणारे कुणाल राठोड (३६) २४ मार्च रोजी रात्री घरी जात होते. याच वेळी येथील निमकर सोसायटी परिसरात दोन व्यक्ती दुचाकीवरून आल्या. त्यांनी राठोड यांच्या हातातील मोबाइल हिसकावून पळ काढला. राठोड यांनी तत्काळ मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला.
परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाची पोलिसांनी तपासणी केली. त्यात पोलिसांना आरोपींच्या दुचाकीचा क्रमांक मिळाला. त्यावरून आरोपींची ओळख पटली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंब्रा परिसरातून मुजमिल मुलानी (२६) आणि बिसुराज अधिकारी (२९) या दोघांना अटक केली. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात भांडुप आणि मुलुंड पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपींकडून मोबाइल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ताब्यात घेतली.
आयपीएलवर सट्टा लावणारा आरोपी अटकेत
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सामन्यांवर सट्टा लावण्यात येत असलेल्या गोवंडीतील एका घरावर रविवारी सायंकाळी गुन्हे शाखेने छापा घातला. यावेळी सट्टा लावणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी काही मोबाइल हस्तगत केले असून पोलीस त्याच्याकडे याबाबत अधिक तपास करीत आहेत.
देशात २२ मार्चपासून सुरू झालेल्या आयपीएलमधील सामन्यांवर एक इसम मोठ्या प्रमाणात सट्टा लावत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ६ च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी त्या ठिकाणी छापा घालण्याचा निर्णय घेतला. दोन कर्मचाऱ्याना कुरिअर देण्याच्या बहाण्याने गोवंडीतील पाटील वाडी येथे पाठवून पोलिसांनी हा छापा घातला. यावेळी आरोपी रमेश परमार (५३) मोबाइलच्या माध्यमातून ‘दिल्ली कॅपिटल’ आणि ‘सनराईज हैदराबाद’ या दोन संघावर सट्टा लावत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची अधिक चौकशी केली. एका ऑनलाईन वेबसाईटवरून सट्टा लावत असल्याचे त्याने चौकशीत पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आरोपीकडून काही मोबाइल हस्तगत केले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कर्करोगाशी लढणाऱ्या अभियंत्याला नवजीवन, मृत्युशी झुंजणाऱ्या तरुणाकडून अनेकांना प्रेरणा
नागपूरमधील रहिवसी असलेला अभियंता तीर्थनकार निरंजन तीर्थनकारला चौथ्या टप्प्याचा रक्ताचा कर्करोग (हॉजकिन्स लिम्फोमा) झाल्याचे निदान झाले.
साक्षीदारांचे जबाब आरोपीला उर्दू भाषेतून उपलब्ध केले नाहीत, पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द
आरोपी शहाबाज अहमद मोहम्मद युसुफ याच्या अटकेच्या जुलै २०२४ मध्ये दंडाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाला त्याच्या वडिलांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
रेस्तराँमधील सेवा शुल्क बेकायदाच! दिल्ली उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्वाळा
ग्राहक पंचायतीकडून सक्तीने सेवाशुल्क आकारण्याच्या रेस्तराँच्या मनमानीविरोधात आघाडी उघडली जाणार आहे.
प्रियकरावर काळी जादू केल्याचे सांगून तांत्रिकाकडून लाखोंची फसवणूक
इंस्टाग्रामवर भेटलेल्या या तांत्रिकाने तक्रारदार महिलेच्या प्रियकरावर जादूटोणा केल्याचा दावा करून तिला विविध विधींसाठी ३.४७ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे.
मुंबईत मार्चमध्ये घरांची विक्रमी विक्री, १५ हजारांहून अधिक घरविक्रीतून राज्य सरकारला १५०० कोटींचा महसूल
रेडीरेकनरच्या दरात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेत ग्राहकांचा कल ३१ मार्चच्या आत घराची नोंदणी करून मुद्रांक शुल्क भरणा करण्याकडे असतो.
नववर्षात गुढी उभारा, कामाला लागा! पालिका निवडणुकीनिमित्त उद्धव ठाकरे यांचे आवाहन
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (ठाकरे) तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी वांद्रे येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना नववर्षात गुढी उभारा, गुढी कुठे उभारायची ते तुम्हाला माहीत आहे.
तेजस्वी ‘तरुण तेजांकितां’चा आज गौरव; केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रमुख अतिथि
मुंबई : बुद्धिमत्ता, जिद्द आणि कल्पकतेच्या संगमाला सामाजिक भानाची जोड देऊन उत्तुंग काम करणारे युवाजन भविष्यातील पिढीसाठी प्रकाशवाटा निर्माण करत आहेत. या युवा गुणीजणांना कौतुकाची थाप देणारा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार सोहळा आज सोमवारी होणार आहे.
मुंबईत आता दोन वेळा होणार रस्त्यांची स्वच्छता
गेल्या काही वर्षांपासून मुंबईत विकासकामे, बांधकामे मोठ्या प्रमाणावर वाढली असून रस्त्यावर धुळीचे प्रमाणही खूप वाढले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता सर्व विभागांमध्ये दिवसातून दोन वेळा रस्ते झाडण्याचे ठरवले आहे.
Video : मुंबईत आणखी एका पर्यटनस्थळाची भर, निसर्ग उन्नत मार्गावर गर्द हिरव्या झाडीतून निसर्गाची किमया अनुभवण्याची संधी
मुंबई : गर्द हिरवी झाडी, पक्षांचा किलबिलाट आणि निसर्गाचे सौंदर्य न्याहाळण्याची संधी मुंबई महानगरपालिकेच्या निसर्ग उन्नत मार्गामुळे मुंबईकर, तसेच देश-विदेशातील पर्यटकांना मिळणार आहे. सिंगापूर येथे विकसित ‘ट्री टॉप वॉक’ या संकल्पनेशी साधर्म्य असलेला निसर्ग उन्नत मार्ग मलबार हिल इथे फिरोजशहा मेहता उद्यान आणि कमला नेहरू उद्यान या ठिकाणी विकसित केला आहे.