Latest News in Mumbai Today : मुंबईतील तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. मागील दोन-तीन दिवस मुंबईत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आता शनिवारपासून पुढील दोन दिवस उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे मुंबईतून आजपासून क्लीन अप मार्शलची सेवा पूर्णतः बंद होणार आहे. गेल्यावर्षी सुरू केलेले कंत्राट संपले असून ४ एप्रिलपासून मुंबईच्या रस्त्यावर क्लीन अप मार्शल दिसणार नाहीत. मुंबईतील अशा महापालिका तसंच राजकीय, गुन्हे क्षेत्रातील, मनोरंजन क्षेत्र, वाहतुकीशी संबंधित विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल.
Mumbai Maharashtra News Today, 4 April 2025
पोलिसांचे लोखंडी रस्ता रोधक चोरणारे दोघे अटकेत
मुंबई: नाकाबंदीदरम्यान रस्त्यावर उभे करण्यात येणारे लोखंडी रस्ता रोधक (बेरिकेड्स) चोरणाऱ्या दोघांना शिवाजी नगर पोलिसांनी रंगेहात अटक केली. आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी रस्ता रोधक हस्तगत केले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वाहनांची तपासणी करण्यासाठी अनेकदा पोलिसांकडून रस्त्यावर नाकाबंदी केली जाते. यासाठी लोखंडी रस्ता रोधक उभारून रस्ता अडवला जातो. शिवाजी नगर पोलीस गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरात अनेक वेळा नाकाबंदी करतात. नाकाबंदीसाठी लागणारे रस्ता रोधक पोलिसांनी येथील रस्त्याच्या कडेला ठेवले आहेत. लोट्स कॉलनी येथे दोन व्यक्ती रस्ता रोधक घेऊन जात असल्याची माहिती एका नागरिकाने २ एप्रिल रोजी पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आरोपी झाकीर हुसेन नगर परिसरात पोहचले होते.
पोलिसांनी तात्काळ तेथे जाऊन दोन्ही आरोपीना रस्ता रोधकांसह रंगेहात पकडले. मात्र दोन्ही आरोपीनी रस्ता रोधक रस्त्यावर टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. रस्ता रोधक विकण्यासाठी चोरल्याचे आरोपींनी चौकशीत कबुल केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
शस्त्रसाठा घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक
मुंबई: अधिकृतरित्या शस्त्रसाठा सोबत घेऊन फिरणाऱ्या एका आरोपीला आरसीएफ पोलिसांनी गुरुवारी रात्री माहुल परिसरात अटक केली. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी दोन रिव्हॉल्व्हर आणि आठ जिवंत काडतुसे हस्तगत केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी निर्जन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गस्त वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून आरसीएफ पोलीस गुरुवारी रात्री माहुल गाव परिसरात गस्त घालत होते. यावेळी तेथे एक व्यक्ती पोलिसांना संशयास्पद फिरताना आढळला. पोलिसांनी तत्काळ त्याला हटकले आणि त्याची चौकशी केली. तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याजवळ दोन रिव्हॉल्व्हर आणि आठ जिवंत काडतुसे सापडली. अंगत सिंग (४२) असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहे. आरसीएफ पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्याकडे सापडलेल्या शस्त्रसाठ्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सायबर हेल्पलाईनमुळे ११ कोटी १९ लाख वाचवण्यात यश; अवघ्या तासाभरात कारवाई
मुंबई : ई-मेलद्वारे कंपनीच्या ११ कोटी ३४ लाखांची सायबर फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तात्काळ सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधल्याने अवघ्या काही तासांतच ११ कोटी १९ लाख रुपये गोठविण्यास सायबर पथकाला यश आले.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास पवई येथील एका तक्रारदाराने मुंबई पोलिसांच्या १९३० सायबर हेल्पलाइनशी संपर्क साधून तक्रार केली. तक्रारीत, अज्ञात व्यक्तीने कंपनीच्या बँक खात्याशी जोडलेला ई-मेल आयडी हॅक केला. त्यानंतर फसवणूक करणाऱ्याने कंपनीच्या नावाने कोटक महिंद्रा बँकेला एक ई-मेल पाठवून व्यवसायाच्या खोट्या बहाण्याने दोन वेगवेगळ्या खात्यांमध्ये ११ कोटी ३४ लाख ८५ हजार २५८ रुपयांचे व्यवहार केले. यामध्ये बँकेची दिशाभूल करत सायबर फसवणूक करण्यात आली.
याबाबत समजताच तक्रारदाराने तात्काळ १९३० सायबर हेल्पलाइनला तक्रार केली. याला तात्काळ प्रतिसाद देत पोलीस निरीक्षक निवृत्ती बावस्कर व त्यांच्या पथकाने तातडीने एनसीसीआरपी पोर्टलवर तक्रार नोंदवून बँक अधिकाऱ्यांशी समन्वय साधला. त्यांनी तात्काळ कारवाई केल्यामुळे खात्यातील ११ कोटी १९ लाख ५० हजार ५०१ रुपये गोठवण्यात यश आले. ती रक्कम परत मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.
माहुलमधील घरे घेता का घरे…पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा अल्प प्रतिसाद, नऊ हजार घरांसाठी केवळ १५० अर्ज
मुंबई महापालिकेने पूर्व उपनगरातील माहुल येथे प्रकल्पबाधितांसाठी घरे बांधली आहेत. यापैकी काही घरांमध्ये प्रकल्पबाधित राहतात. तर बहुतांशी घरे रिकामी आहेत.
मुंबईत आजपासून ‘क्लीन अप मार्शल’ बंद; दिसल्यास तक्रार करा
मुंबई : मुंबईतून आजपासून क्लीन अप मार्शलची सेवा पूर्णतः बंद होणार आहे. गेल्यावर्षी सुरू केलेले कंत्राट संपले असून ४ एप्रिलपासून मुंबईच्या रस्त्यावर क्लीन अप मार्शल दिसणार नाहीत.
मूर्तिकार गजानन तोंडवळकर यांचे निधन
मुंबई : बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष मूर्तिकार गजानन तोंडवळकर उर्फ अण्णा तोंडवळकर यांचे दीर्घ आजाराने मालवण तालुक्यातील पेंडुर या गावी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शारदा, मुलगा निलेश, सून, मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. मूर्तिकार गजानन तोंडवळकर यांनी गणेशगल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाची सलग १३ वर्षे भव्य लक्षवेधी गणेशमूर्ती साकारली. तसेच त्यांनी गणेशगल्ली, रंगारी बदक चाळ, उमरखाडी, जाखादेवी मंडळ, प्रभादेवी आदी विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये साकारलेले आकर्षक देखावे विशेष गाजले होते. तसेच त्यांनी नवरात्रौत्सवात साकारलेल्या कालिमाता, अंबामाता, महिषासुर मर्दिनी, आई तुळजाभवानीच्या रूपातील देवीच्या मूर्तीही लक्षवेधी होत्या. विशेष बाब म्हणजे आजारपणाच्या काळातही तोंडवळकर यांनी गणेशमूर्ती व देवीच्या मूर्ती साकारल्या. बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मूर्तिकारांचे विविध प्रश्नही राजकीय मंडळींसमोर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निधनाने गणेश मूर्तिकला क्षेत्रातील अव्वल तारा हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईत ९०,७५७ भटके श्वान; दहा वर्षात श्वानांची संख्या साडेचार हजाराने घटली
मुंबई : मुंबईतील भटक्या श्वानांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून मुंबईत सध्या ९०,७५७ भटके श्वान असल्याचे मुंबई महापालिकेने जाहीर केले आहे. मुंबईत २०१४ मध्ये ९५,१७२ भटके श्वान होते. गेल्या १० वर्षांमध्ये मुंबईतील श्वानांची संख्या साडेचार हजाराने कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
मुंबईच्या तीन प्रवेशद्वारांवर एफडीएची धडक मोहीम; १ लाख ५० हजार लिटर दुधाची तपासणी करून तपासणीसाठी घेतले १०८ नमुने
मुंबई : नागरिकांना भेसळविरहित दूध मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी पहाटे मुंबईच्या तीन प्रवेशद्वारांवर दूध तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत मुंबईमध्ये येणाऱ्या जवळपास १ लाख ५० हजार लिटर दुधाच्या साठ्याची तपासणी करण्यात आली.
पश्चिम रेल्वेवरील सर्व विभागांचे १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण; मुंबई ते गुजरातपर्यंत ६६१ विद्युत इंजिनाची धाव वाढणार
मुंबई : भारतीय रेल्वेमध्ये करण्यात आलेल्या विद्युतीकरणाला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली. यात पश्चिम रेल्वेच्या राजकोट विभागातील शेवटच्या टप्प्यातील विद्युतीकरण पूर्ण झाले. त्यामुळे मार्च २०२५ पर्यंत संपूर्ण विभागांचे १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण केले आहे. आता मुंबई – गुजरातपर्यंत ६६१ विद्युत इंजिनाच्या रेल्वेगाड्यांची धाव वाढण्याची शक्यता आहे.
सीआयएसएफच्या मद्यधुंद चालकाने रिक्षाला दिली धडक; दुभाजक ओलांडून दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू, तिघे जखमी
मुंबईः गोरेगाव पूर्व येथील उड्डाणपुलावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) चालकाने भरधाववेगात वाहन चालवून गुरूवारी रिक्षाला धडक दिल्याने ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिच्या दोन मुली आणि रिक्षाचालक जखमी झाले आहेत.
कुर्ला येथील ‘हा’ रस्ता पदपथाविनाच पादचाऱ्यांचा जीव धोक्यात
मुंबई : मुंबई महापालिकेने अर्थसंकल्पात युनिव्हर्सल पदपथ धोरणाची घोषणा केलेली असली तरी कुर्ला येथील एक रस्ता पदपथाविनाच आहे. कुर्ला अंधेरी मार्गावरील एरोसिटी ते सफेद पूल पेट्रोल पंप या मार्गावर पदपथच नाही. वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्यामुळे पादचाऱ्यांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन येथून चालावे लागत आहे.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करा’; चैत्यभूमीवर सुविधा पुरविण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या येत्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतील. त्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे. या जयंती सोहळ्याचे सर्व संबंधित विभाग व यंत्रणा, पोलीस आणि मुंबई महापालिका प्रशासनासह योग्य समन्वयाने भव्य, दिव्य आणि दिमाखदार आयोजन करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले.
मुंबई उपनगरांत कुपोषित बालके आढळणे चिंताजनक; पालकमंत्री आशीष शेलार यांची खंत, तात्काळ उपाययोजनेचे प्रशासनाला निर्देश
मुंबई : मुंबई उपनगरसारख्या प्रगत जिल्ह्यात कुपोषित बालके तपासात आढळणे, ही बाब चिंताजनक असून त्यावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना निश्चित करून १० दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी गुरुवारी दिले.
‘मेट्रो २ ब’च्या कामात हलगर्जी: कंत्राटदारांना १.२९ कोटींचा दंड, ‘एमएमआरडीए’ची कारवाई
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अंधेरी पश्चिम, डी. एन. नगर-मंडाले ‘मेट्रो-२ ब’चे काम हाती घेतले आहे. या मार्गिकेतील डायमंड गार्डनर-मानखुर्द हा पहिला टप्पा या वर्षाच्या अखेर सेवेत दाखल करण्याचे नियोजन आहे. मात्र कंत्राटदारांच्या हलगर्जीमुळे पहिल्या टप्प्याच्या कामास प्रचंड विलंब होत आहे. याची दखल घेत ‘एमएमआरडीए’ने दोन्ही कंत्राटदारांना एकूण १ कोटी २९ लाख रुपये दंड ठोठावला आहे.
‘आरे’ दूध पुन्हा मुंबईकरांच्या घरांत
मुंबई : मुंबईकर ग्राहकांच्या मागणीनुसार आरे नाममुद्रा (ब्रॅण्ड) असलेले पिशवीबंद दूध पुन्हा मुंबईच्या बाजारात उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मर्यादित अर्थात महानंदच्या वतीने आरे दूध पुन्हा बाजारात आणले जाणार आहे.
१२ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्याला अटक; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
मुंबईः हातगाडी बनावण्याचे साहित्य परत करण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी महापालिका कर्मचाऱ्याला अटक केली. त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स