Latest News in Mumbai Today : मुंबईमध्ये सध्या तापमानात चढ-उतार सुरू आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा कमी झाला असला तरी वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकरांची गेले काही दिवस काहिली होत आहे. मुंबईत ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, बुधवारी मुंबईत उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे दिशा सालियनच्या वडिलांचे वकील ओझा यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून अवमान कारवाई सुरू केली. त्याचाच भाग म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर अवमानप्रकरणी कारवाई का करू नये याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले. तेव्हा मुंबई शहरातील आर्थिक, राजकारण, गुन्हे, वाहतूक, हवामान, न्यायालय, गुन्हे अशा विविध क्षेत्रातील घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून घेता येईल.
Mumbai Maharashtra News Today, 9 April 2025
शेअर बाजारातील गुंतवणुकीचे आमिष दाखवून व्यावसायिकाची ५५ लाखांची सायबर फसवणूक
मुंबई : इलेक्ट्रीक वस्तूंची निर्मिती करणाऱ्या ६६ वर्षीय व्यावसायिकाला शेअर बाजारातील गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५५ लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शीव येथील रहिवासी व्यावसायिकाने याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बँक व्यवहाराच्या माध्यमातून पोलीस तपास करीत आहेत.
प्रभादेवी पूल होणार बंद होणार…वाहतूक पोलिसांनी मागविल्या सूचना, हरकती
मुंबई : शिवडी-वरळी उन्नत मार्गाअंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकाला जोडणारा सध्याचा प्रभादेवी पूल बंद करून तो पाडण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) हा पूल पाडून त्याजागी नवीन द्विस्तरीय पूल (डबलडेकर पूल) बांधणार आहे. हा पूल बंद करण्यासाठी, पुलाच्या पाडकामासाठी परवानगी देण्याकरीता वाहतूक पोलिसांनी आता नागरिकांकडून सूचना-हरकती मागविल्या आहेत.
एमएमआरडीएच्या प्रकल्पांना ४ लाख कोटींचे अर्थबळ, आतापर्यंत विविध वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्ज उभारणी
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कोट्यवधी रुपये खर्चाचे प्रकल्प राबवित आहे. प्रकल्पांसाठी लागणारा कोट्यवधींचा निधी कर्ज रुपाने उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स