Latest News in Mumbai Today : मुंबई हे भारताचे आर्थिक आणि विविध संस्कृतींचे एक ठिकाण आहे जिथे संपूर्ण भारत आणि जगभरातून लोक येतात . तेव्हा राजकीय घडामोडी, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी, वाहतूकीचे अपडेट्स, गुन्हे क्षेत्रातील बातम्या, आर्थिक घडामोडी, नागरी समस्या याबाबतच्या घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून जाणून घेता येईल…
बेलापूर जंक्शनवरील हवा गुणवत्ता निर्देशांक फलक बंदच
मुंबई : हवामानासह प्रदूषणाची इत्यंभूत माहिती देणारे बेलापूर जंक्शनजवळील हवा गुणवत्ता निर्देशांक डिजिटल डिस्प्ले बोर्ड गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना हवामानासह हवेच्या गुणवत्तेची माहिती मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, हा फलक लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी पर्यावरणप्रेमी तसेच स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
हिरे व्यापाऱ्याची दीड कोटींना फसवणूक
मुंबई : हिरे व्यापाऱ्याची दीड कोटी रुपयांचे हिऱ्यांचा अपहार केल्याप्रकरणी तिघांविरोधात वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिघेही दलाल असून त्यांनी इतर व्यापाऱ्यांचीही अशा प्रकारे फसवणूक केल्याचा संशय असून त्याबाबत पोलीस तपास करत आहेत.
याप्रकरणातील तक्रारदार संदीप भदानी हे हिरे व्यापारी असून बीकेसी डायमंड पार्क येथे त्यांचे कार्यालय आहे. मिरा रोड येथील राहणारा एक दलाल त्यांच्या परिचयाचा होता. हा दलाल गेल्या चारवर्षांपासून हिरे विक्री करत असल्यामुळे भदानी यांचा त्याच्यावर विश्वास होता. गेल्यावर्षी १ मे रोजी त्याने एका व्यावसायिकाला देण्यासाठी एकूण ३७ लाख ८६ हजार ८१६ रुपये किंमतीचे हिरे नेले. पण, ठरलेल्या वेळेत त्यांनी पैसे पोच केले नाहीत. त्यानंतर त्याने संबंधीत व्यावसायिकाला आणखी हिऱ्यांची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानुसार त्याने हिरे व्यापारी भदानी यांच्याकडून ४६ लाख ४६ हजार ९५० रुपये किंमतीचे आणखी हिरे नेले. त्यानंतरही अनेक दिवस झाल्यानंतर व्यापाऱ्याचे पैसे आले नाहीत.
हिरे व्यापाऱ्याने दलालाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद असल्याचे निष्पन्न झाले. याच दरम्यान, त्यांनी तपासणी केली असता दलालाने आणखी एका हिरे व्यावसायिकाकडून ६० लाख ७५ हजार ७०० रुपये किंमतीचे हिरे घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे त्यांना समजले. ते कळल्यावर त्यांना धक्का बसला. अखेर, त्यांनी बीकेसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी तिघांंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
केंद्र सरकारचा रासायनिक खतांबाबत मोठा निर्णय; जाणून घ्या, खरीप हंगामासाठी रासायनिक खतांसाठी किती अनुदान मिळणार
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आगामी खरीप हंगामासाठी खत अनुदानाला मंजुरी दिली. स्फुरद (फॉस्फेट) आणि पालाश (पोटॅश) खतांसाठी पोषक तत्त्वावर आधारित अनुदान (एनबीएस) दरांना मान्यता दिली. जून ते सप्टेंबर या कालावधीत वापरात येणाऱ्या खतांसाठी ३७,२१६.१५ कोटी रुपयांचे खत अनुदान देण्यात येणार आहे.
पावसाळ्यात उपनगरीय रेल्वे बंद पडू देऊ नका… रेल्वेतील उदघोषणा सुरू ठेवा; महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश
मुंबई: येत्या पावसाळ्यात उपनगरीय रेल्वे सेवा अव्याहतपणे सुरु राहील याची दक्षता घ्यावी, पावसाचे पाणी साचण्याच्या ठिकाणांची संयुक्त पाहणी करून उपाययोजना आखाव्यात. तसेच रेल्वेमध्ये सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत सर्व यंत्रणांना दिले.
उन्हाळ्याच्या तडाख्यात बेस्टकडून दिलासा… बेस्टच्या तीन मार्गावर वातानुकुलित गाड्या
मुंबई: पूर्व उपनगरातील नागरिकांना लवकरच बेस्टचा गारेगार प्रवास अनुभवायला मिळणार आहे. बेस्टच्या तीन मार्गावर लवकरच वातानुकूलित गाड्या धावणार आहेत. त्यामुळे सध्या वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर बेस्टच्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. बेस्ट उपक्रमाने प्रवाशांसाठी उन्हाळ्याच्या तोंडावर दिलासादायक बातमी दिली आहे.
आरेमध्ये बुलडोझर बंदीसाठी रॅली
मुंबई : आरे दुग्ध वसाहत परिसरातील रस्त्यालगत असलेली छोटी दुकाने टपऱ्यांवर आरे दुग्ध वसाहत प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. कोणतेही पूर्वकल्पना न देता कारवाई करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्याचाच निषेध म्हणून शुक्रवारी जिवाचा पाडा ते आरे दुग्ध वसाहतीपर्यंत बुलडोझर बंदीसाठी फेरी काढण्यात आली होती.
रस्ते झाडांच्या मुळावर; कंत्राटदाराला ५० हजारांचा दंड
मुंबई: मुंबई शहर व उपनगरांत सुरू असलेल्या रस्ते कामांचा फटका झाडांना बसू लागला आहे. प्रभादेवी येथे ५० ते ६० झाडांच्या मुळांना रस्ते कामादरम्यान धक्का लागल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित कंत्राटदाराला ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. कामादरम्यान योग्य खबरदारी घेण्यात न आल्याने ३५ ते ४५ वर्षे जुन्या झाडांचे नुकसान झाले आहे.
शिरढोणमधील १५ इमारतींचेही म्हाडाने वीज देयके थकवले, महावितरण वीज खंडीत केल्यानंतर कोकण मंडळाला जाग
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने गोरेगाव, पहाडी येथील अत्यल्प-अल्प गटातील इमारतींची पाण्याची आणि विजेची देयके थकविली होती. त्यात आता कोकण मंडळानेही शिरढोण प्रकल्पातील १५ इमारतींचे विजेची देयके थकविल्याने महावितरणने गुरुवारी इमारतींचा वीज पुरवठा खंडीत केला होता. रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतर मात्र कोकण मंडळाला देयके थकल्याची जाणिव झाली आणि अखेर देयके भरल्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत झाला.
ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क, दंगलीबाबत समाज माध्यमांवरील पोस्ट
मुंबई : समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये रमजान ईदच्या दिवशी डोंगरी परिसरात हिंदू-मुस्लिम दंगल, जाळपोळ आणि बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. या पोस्टमध्ये बेकायदेशीर रोहिंग्या, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर अशा घटनांमध्ये सहभागी होऊ शकतात, असा आरोप करण्यात आला आहे.
रमाबाई आंबेडकर नगर पुनर्वसन योजना :आतापर्यंत १०,५०१ झोपड्या पात्र
मुंबई : घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरमधील १४ हजार ४५४ झोपड्यांचे सर्वेक्षण नुकतेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने पूर्ण केले. या सर्वेक्षणाच्या आधारे १० हजार ५०१ झोपड्या पात्र ठरल्या आहेत. पात्र झोपड्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील अर्थात एन-१९ मधील ४०५३ पैकी २९३१ झोपड्यांचा समावेश आहे. तर १४ हजार ४५४ पैकी ३९५३ झोपडीधारकांनी झोपु प्राधिकरणाकडे कागदपत्रेच जमा केलेली नाही.
पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवले, २३ वर्षीय महिला गंभीर भाजली
मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून २३ वर्षीय महिलेच्या अंगावर तिच्या पतीने रॉकेल टाकून तिला पेटवून दिल्याचा प्रकार वांद्रे पूर्व परिसरात घडला आहे. त्यात महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला गुरूवारी अटक केली.सिमरन सलमान कुरेशी (२३) असे जखमी महिलेचे नाव आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला आव्हान; ठराव रद्द करण्याची युवासेनेची मागणी, आज सुनावणी
मुंबई विद्यापीठाच्या नुकताच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिसभेत विद्यापीठाचा वित्तीय वर्ष २०२५-२६ साठीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. मात्र, हा अर्थसंकल्प विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर झालेला नसल्याचा दावा करून ठाकरे गटाच्या युवा सेनेने त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
भविष्य घडविणाऱ्या वर्तमानाचा गौरव;‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार सोहळा ३१ मार्च रोजी
मुंबई : वर्तमानाकडून भविष्याला नेहमीच दिशा प्राप्त होत असते, हेच जाणून भविष्य घडविणाऱ्या वर्तमानाचा गौरव ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार देऊन करण्यात येतो. विविध क्षेत्रांमध्ये लखलखते यश संपादन करणाऱ्या आणि समाजोपयोगी कामांमध्ये झोकून देत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या २० तरुण तेजांकितांचा सन्मान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवार, ३१ मार्च रोजी केला जाईल.
मंत्रालयात पाणीबाणी; तीन दिवसांपासून ठणठणाट; जाणून घ्या, नेमकं काय झालं, अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे बोट
मुंबई : नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील पाणीटंचाईवर वादळी चर्चा झाली. पण, राज्याचा गाडा हाकणाऱ्या दस्तूरखुद्द मंत्रालयातच तीन दिवसांपासून पाणीबाणी असल्याचे समोर आले आहे.
भूखंड घेता का भूखंड… श्रीमंत मुंबई महापालिकेवर भूखंड विकण्याची वेळ का आली? किमती कमी करून तरी खरेदीदार मिळतील?
श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत आटत चालले असून महसूल वाढविण्यासाठी उत्पन्नाचे नवीन मोठे पर्यायही सध्या नाहीत. येत्या काही वर्षांत दैनंदिन खर्चासोबतच प्रकल्पांवरचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे महसूल वाढीसाठी पालिकेने मुंबईतील तीन भूखंडांचा लिलाव करण्याचे ठरवले आहे.