गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून खरेदीसाठी रविवार २८ ऑगस्ट हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे होणारी गर्दी पाहता पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने मुख्य मार्गावर मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे हार्बर आणि ठाणे-वाशी, नेरुळ ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
ठाणे- वाशी, नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी, नेरुळ, पनवेलसाठी आणि वाशी, नेरुळ, पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – मुंबई : प्रकाश सुर्वे यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती – शिंदे गटाकडून घोषणा
सीएसएमटी येथून चुनाभट्टी, वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी, वांद्रे -सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटी, वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी, बेलापूर, पनवेलला जाणाऱ्या आणि सीएसएमटीतून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ या कालावधीत वांद्रे, गोरेगाव येथे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.
पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या आणि गोरेगाव, वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत.
ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत.