मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणे टप्प्याचे १०० टक्के काम पूर्ण झाले असून आता या टप्प्यातील कामांवर अखेरचा हात फिरविण्यात येत आहे. ही कामे पूर्ण होताच हा टप्पा मार्चमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) नियोजन आहे. त्यामुळे नव्या वर्षात नागपूर – मुंबई प्रवास अतिवेगवान, केवळ आठ तासांचा होणार आहे.
ठाणे खाडी पूल ३ वरील उत्तरेकडील बाजूही मार्चमध्ये वाहतूक सेवेत दाखल होत आहे. तर मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे कामही पूर्णत्वाच्या दिशेने आहे. मिसिंग लिंकही नव्या वर्षात वाहतुकीसाठी खुली होणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात मुंबई-पुणे प्रवासही सुकर होणार आहे. एमएसआरडीसी विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, पुणे वर्तुळाकार रस्ता, जालना-नांदेड द्रुतगती मार्गासह अन्य काही रस्ते प्रकल्पांची कामे हाती घेणार आहे. एकूणच नवीन २०२५ वर्ष हे रस्ते विकासाला गती देणारे ठरणार आहे.
मुंबई -नागपूर प्रवास आठ तासात करता यावा यासाठी एमएसआरडीसी नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग बांधत आहे. फेब्रुवारीअखेरीस हे काम पूर्ण होईल आणि मार्चच्या सुरुवातीला हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. मुंबई – नागपूर प्रवास अतिवेगवान करतानाच एमएसआरडीसीने मुंबई – पुणे प्रवास सुकर करण्यासाठी दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. यातील एक म्हणजे मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली – कुसगाव नवीन मार्गिका अर्थात मिसिंग लिंक प्रकल्प. तर दुसरा प्रकल्प म्हणजे ठाणे खाडी पूल ३ प्रकल्प. ठाणे खाडी पूल १ आणि २ वरील वाहनांचा भार कमी करण्यासाठी ठाणे खाडी पूल २ ला समांतर असा ठाणे खाडी पूल ३ बांधण्यात येत आहे. १.८३७ किमी लांबीच्या या पुलाची दक्षिणेकडील बाजू (मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी बाजू) सप्टेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली आहे. आता मार्चमध्ये उत्तरेकडील (पुण्याहून मुंबईला येणाऱ्या) मार्गिकेचे लोकार्पण करून ती वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली. मिसिंग लिंकचेही काम वेगात सुरू असून जून २०२५ पर्यंत मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुली करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. ही मार्गिका खुली झाल्यास मुंबई – पुणे प्रवासाचा कालावधी २५ मिनिटांनी कमी होणार आहे.
हेही वाचा…सलग १३ महिने तापमान वाढीचे ? जाणून घ्या, सरलेले वर्ष आजवरचे सर्वांत उष्ण वर्ष का ठरले ?
विविध प्रकल्पांना गती
२०२५ मध्ये पुण्यातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या पुणे वर्तुळाकार रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. या प्रकल्पातील भूसंपादन पूर्ण झाले असून कंत्राटदाराला कार्यादेशही देण्यात आले आहेत. त्याचवेळी जालना – नांदेड द्रुतगती महामार्ग (समृद्धी महामार्ग विस्तारीकरण) प्रकल्पासह नागपूर – चंद्रपूर, भंडारा – गडचिरोली आणि नागपूर – गोंदिया द्रुतगती महामार्गांच्याही कामाला सुरुवात करण्याचे नियोजन असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
अलिबाग-विरार बहुउद्देशीय मार्गिका
मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प म्हणजे अलिबाग-विरार बहुउद्देशीय मार्गिका. अनेक वर्षे रखडलेला हा प्रकल्प नव्या वर्षात मार्गी लावण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. या प्रकल्पासाठीच्या कंत्राटाला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. येत्या काही दिवसात भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावून २०२५ मध्ये या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.