मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांकडून विशेष खबरदारीची पावले उचलली आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर दररोज ७५ ते ८० लाख प्रवाशांचा प्रवास होतो. ६ डिसेंबरला मात्र दैनंदिन प्रवाशी संख्या ९० ते ९५ लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता गर्दीचे विभाजन करण्यासाठी अनेक मार्ग बंद केले आहेत. त्याऐवजी पर्यायी नवीन मार्ग खुले केले आहेत. तसेच मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातून चैत्यभूमीकडे जाणारा मार्ग सूचित करण्यासाठी जागोजागी सूचना फलक लावण्यात आले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. यामधील बहुतांश अनुयायी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांनी आणि लोकलने दादर गाठतात. परिणामी ५ आणि ६ डिसेंबर रोजी रेल्वेचे नियमित प्रवाशी तसेच दर्शनासाठी आलेले अनुयायी हे एकत्र आल्यामुळे स्थानक परिसरात अफाट गर्दी होईल. त्यामुळे रेल्वे पोलिसांसह आरपीएफ, गृहरक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि इतर सुरक्षा व्यवस्थेचा फौजफाटा दादर स्थानकात तैनात केला आहे. सुरक्षेसह पादचारी पुलांचे नियोजन प्रशासनाकडून केले आहे.
हेही वाचा…एचआयव्ही बाधितांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक
दादर मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी तसेच स्थानकाबाहेर पडण्यासाठी, मुख्यत्वे दादर मध्य रेल्वे स्थानक पूर्व-पश्चिम जोडणारा मध्य मोठा पादचारी पुल, उत्तर दिशेकडील स्कायवॉक पादचारी पूल, दक्षिण दिशेकडील महानगर पालिका पादचारी पुल, इतर पादचारी पुलाचा वापर करण्यात येतो. ५, ६ डिसेंबर रोजी दादर मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकावर मोठया प्रमाणावर गर्दी होणार असल्याने रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी, अनुयायी त्याचबरोबर बाहेरुन रेल्वे स्थानकात येणारे प्रवासी, अनुयायी हे एकमेकांसमोर येऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन त्यातून चेंगराचेंगरी सारखी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ५ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते ६ डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यंत पादचारी पुलांच्या वापराबाबत काही निर्बंध असतील.
दादर मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकातील पूर्व-पश्चिम जोडणारा मध्य मोठा पूल व फलाट क्रमांक १२ वरील सर्व प्रवेशद्वार महापालिका हद्दीतून रेल्वे स्थानकात येणाऱ्या अनुयायी , प्रवाशांकरीता बंद राहील. हा पूल फक्त लोकल आणि रेल्वेगाड्यांनी येणाऱ्या प्रवाशांना पूर्व-पश्चिमेकडे महापालिका हद्दीत बाहेर जाण्याकरीता आणि दादर मध्य , पश्चिम रेल्वे स्थानकातील एका फलाटावरुन दुसऱ्या फलाटावर जाण्याकरीता खुला राहील.स्कायवॉक हा स्थानकाबाहेरील पूर्व-पश्चिम महानगरपालिका हद्दीतून येणाऱ्या अनुयायी आणि दैनंदिन रेल्वे प्रवाशांकरीता दादर रेल्वे स्थानकांवरील फलाटावर येण्याकरीता खुला राहील.
हेही वाचा…घाटकोपर फलक दुर्घटना भावेश भिंडेची दोषमुक्ततेची मागणी
दादर मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकात लोकल, रेल्वे / मेलगाड्यांनी येथून दादर येथे उतरणाऱ्या प्रवाशांना तसेच अनुयायी यांना पूर्व-पश्चिमेकडे महापालिका हद्दीत बाहेर जाण्यासाठी खुला राहील.महानगरपालिका पुलाबाहेरील पूर्व-पश्चिम महापालिका हद्दीतून दादर रेल्वे स्थानक येथे फलाटावर येणाऱ्या अनुयायी, दैनंदिन रेल्वे प्रवाशांकरीता खुला राहील.
दादर मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकात लोकल, रेल्वेगाड्यांनी येऊन दादर येथे उतरणाऱ्या प्रवासी आणि अनुयायांसाठी पूर्व-पश्चिमेकडे महापालिका हद्दीत बाहेर जाण्यास बंद ठेवण्यात येईल.मध्य मोठ्या पादचारी पुलाच्या उत्तरेकडील मध्य रेल्वेवरील पादचारी पूल हा दादर मध्य रेल्वे स्थानकातील फलाटावर उतरणाऱ्या प्रवाशांना फलाट बदलण्याकरीता आणि पूर्व बाजूस महानगरपालिका हद्दीत जाण्याकरीता खुला राहील.मध्य मोठ्या पुलाच्या उत्तरेकडील मध्य आणि पश्चिम स्थानकांना जोडणारा पादचारी पुल हा फक्त फलाटावरील प्रवाशांकरिता फलाट बदलण्याकरिता खुला राहील. तसेच पादचारी पुलावरून मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकावरील रेल्वे प्रवाशी हे मध्य रेल्वेच्या हददीपासून स्कायवॉक पादचारी पुलाकडे वळविण्यात येतील.पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानक फलाट क्रमांक १ वरील स्कायवॉकलगतचे गेट क्रमांक १,६ व ७ वगळता सर्व प्रवेशद्वार ही रेल्वे प्रवाशी आणि अनुयायी यांना शहर हद्दीतून फलाटावर येण्यास बंद राहतील.
हेही वाचा…बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण अटकेतील २६ आरोपींवर मोक्का
पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानक फलाट क्रमांक १ वरील पादचारी पूल महानगरपालिका हद्दीतून येणाऱ्या रेल्वे प्रवाशी आणि अनुयायी यांना पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यास बंद राहील.पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानक फलाट क्रमांक २/३, ४/५ वर उतरणाऱ्या प्रवाशांना या पुलावर येऊन स्कायवॉकमार्गे महानगरपालिका हद्दीत पूर्व आणि पश्चिम दिशेने जाता येईल. तसेच स्कायवॉकमार्गे प्रवाशांना मध्य रेल्वे स्थानक फलाट क्रमांक ९/१०, १०/११ व १२, १३/१४ वर प्रवेश करता येईल. तसेच या पुलावर दादर पश्चिम रेल्वे स्थानकाचे फलाट क्रमांक १ वरील जिन्यावरून व उद्वाहनाने येता येईल.