मुंबई : अंधेरी येथील तक्षशिला परिसरातील शेर – ए- पंजाब सोसायटीजवळ शनिवारी मध्यरात्री फुटलेल्या गॅसवाहिनीच्या दुर्घटनेतील एका रुग्णाचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यू झाला. अमन सरोज (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे. उर्वरीत दोन रुग्णांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, संबंधित रस्त्याखालील गळती लागलेल्या मलनिस्सारण वाहिनीची दुरुस्ती करताना जेसीबीचा गॅसवाहिनीला धक्का लागून आगीची दुर्घटना घडली. त्यामुळे दुरुस्ती कामातील हलगर्जीप्रकरणी जेसीबीचालक आणि कंत्राटदाराविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महानगरपालिकेने संबंधित रस्त्याखालील मलनिस्सारण वाहिनीला गळती लागल्यामुळे दुरुस्तीचे काम खाजगी कंत्राटदाराला दिले होते. दुरुस्तीच्या कामादरम्यान रस्त्याखालील एमजीएल आणि पीएनजी वायूचा पुरवठा करणाऱ्या गॅसवाहिनीला धक्का लागल्यामुळे आगीची दुर्घटना घडली. गळतीबाबत अनभिज्ञ वाहनचालक त्या रत्स्यावरून जात असताना दोन धावत्या वाहनांनी पेट घेतला. या दुर्घटनेत दोन दुचाकीस्वार आणि एक रिक्षाचालक होरपळल्याने त्यांना अन्य नागरिकांनी नजीकच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले होते. सुरेश गुप्ता – रिक्षाचालक (५२), अरविंदकुमार कैथल – दुचाकीस्वार (२१), अमन सरोज – दुचाकीस्वार (२२) अशी जखमींची नावे आहेत. पुढील उपचारासाठी अरविंदकुमार आणि अमन यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्याविना त्यांना ट्रॉमा केअर रुग्णालयातून नेले आणि ऐरोली बर्न रुग्णायात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान अमन सरोज यांचा सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तरुणाचा मृत्यू झाला.
अरविंदकुमार याचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुर्घटनेतील सुरेश गुप्ता या रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मलनिस्सारण वाहिनीच्या दुरुस्तीकामात हलगर्जी आढळून आल्याने पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. मात्र, जेसीबीचा वाहनचालक फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.