मुंबई : प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि कार्यक्षम होण्यासाठी अतिरिक्त मार्गिका म्हणून कळवा – ऐरोली उन्नत मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. मात्र, प्रकल्पाच्या कामाची गती मंदावल्याने सध्या प्रवाशांचा प्रवास रडतखडत सुरू आहे. गेल्या साडेसात वर्षांत कळवा – ऐरोली उन्नत मार्गाचे ४६ टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी साधारण पुढील तीन वर्षे कालवधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी, तूर्तास प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करीतच प्रवास करावा लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महानगरात परराज्यातून राहणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोना काळानंतर नव्याने वास्तव्यास आलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे लोकलवर अधिक ताण येत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर नवीन पायाभूत वाहतूक सुविधा वाढवण्यावर भर देणे अपेक्षित आहे. मात्र रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्यास विलंब होत आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (‘एमआरव्हीसी’) ‘मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३’ (एमयूटीपी-३) अंतर्गत डिसेंबर २०१६ मध्ये कळवा – ऐरोली उन्नत मार्ग मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाची घोषणा २०१४ मध्ये करण्यात आली होती. हा प्रकल्प दोन टप्प्यांत विभागण्यात आला असून पहिल्या टप्प्यात दिघा गावात नवीन स्थानक बांधण्यात आले. हे स्थानक जानेवारी २०२४ मध्ये कार्यान्वित झाले. तसेच पुलांची कामेगी करण्यात आली. भूसंपादन आणि पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील कळवा – ऐरोलीदरम्यानच्या उन्नत मार्गाच्या कामाला सुरुवात होईल. या प्रकल्पामुळे ठाणे – मुलुंड मार्गावरील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यास मदत होईल. तसेच वाशी – बेलापूर ते कल्याण दरम्यान थेट लोकल सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाला राज्य सरकार, केंद्र सरकार आणि खासगी बँकांकडून निधी उपलब्ध करण्यात येत आहे.

हेही वाचा – मेट्रो ३ : आरे ते बीकेसी टप्पा दसऱ्यापूर्वी वाहतूक सेवेत, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

भूसंपादन कूर्मगतीने

प्रकल्पासाठी एकूण २.४० हेक्टर जमीन आवश्यक आहे. त्यात १.८७ हेक्टर सरकारी आणि ०.५३ हेक्टर खासगी जमीन आहे. सरकारी जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. मात्र खासगी जमिनीचे संपादन बाकी आहे. विलंबाने सुरू असलेले भूसंपादन दुसऱ्या टप्प्यातील कामात सर्वात मोठा अडथळा बनला आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ४७६ कोटी रुपये आहे. सध्या ४६ टक्के कामे पूर्ण झाले असून पुढील कामे पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. मात्र, भूसंपादन आणि पुनर्वसन करण्यास आणखी दिरंगाई झाल्यास प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे.

एमएमआरडीए या प्रकल्पातील ८६८ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करणार आहे. आतापर्यंत ८२ कुटुंबांची पडताळणी आणि पुनर्वसन पूर्ण झाले आहे. उर्वरित ७८६ कुटुंबांयांनी शिवाजी नगर व भोला नगर परिसरातच पुनर्वसन करण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्यास विलंब होत आहे. एमएमआरडीएने येथील रहिवाशांच्या अनेक बैठका घेतल्या. मात्र सकारात्मक निर्णय होऊ शकलेला नाही.

हेही वाचा – मुंबई : घाटकोपरमध्ये तरुणाची हत्या

मंजूर खर्च – ४७६ कोटी रुपये

सध्याचे पूर्ण काम – ४६ टक्के

काम पूर्ण करण्यासाठी अवधी – ३६ महिने

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai only 46 percent of the kalwa airoli elevated project has been completed in seven and a half years mumbai print news ssb