Fire in Mumbai : मुंबईतील बहुमजली इमारतीत आज पहाटे भीषण आग लागली. भायखळा पूर्व येथील घोडपदेव विभागातील म्हाडा संकुलातील न्यु हिंद मिल कपाऊंडच्या ३ सी या २४ मजली इमारतीला आग लागली. आग लागल्यानंतर इमारतीतील १३५ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. तसंच, अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी ७.२० मिनिटांनी आग अटोक्यात आणण्यात यश आलं आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फानान्शिअल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, या इमारतीला पहाटे ३.४० मिनिटांनी तिसऱ्या मजलावर आग लागली. या इमारतीत मिल कामगार आणि संक्रमण शिबिरातील रहिवासी राहतात.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, एक ते चोवीस मजल्यांवरील इलेक्ट्रिक मीटर केबिन, वायरिंग, केबल आणि इलेक्ट्रिक डक्टमधील साहित्यात ही आग लागली. तसंच, १३५ जणांपैकी २५ जणांना इमारतीच्या टेरेसवरून, ३० जणांना १५ व्या मजल्यावरील आश्रयस्थानातून आणि ८० जणांना २२व्या मजल्यावरील आश्रयस्थानातून बाहेर काढण्यात आले.

माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, तीन पाण्याचे टँकर आणि अग्निशमन दलाच्या इतर गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. ३.४० मिनिटांनी लागलेली आग सकाळी ७.२० वाजता विझवण्यात आली, असं वृत्त पीटीआयने दिलं.

“पहाटे आम्ही साखर झोपेत असताना धुराचे लोट पसरू लागले. आम्हाला काही कळायच्या आत संपूर्ण इमारतीत धूर पसरला. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं. आगीची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या. परंतु, अनेक नागरिक अद्यापही भयभीत आहेत. लिफ्ट बंद झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना बाहेर काढण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यांच्यासाठी रुग्णवाहिकाही तातडीने बोलवाव्या लागल्या. म्हाडासारख्या इमारतीत आगी लागल्या तर सामान्य नागरिकांनी सुरक्षित कसं राहायचं?” असा प्रश्न इमारतीतील रहिवासी देवेंद्र कांबळी यांनी उपस्थित केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai over 130 rescued after fire breaks out at high rise residential building in ghodapdeo sgk
Show comments