मुंबई : शाळा, महाविद्यालयांना पडलेल्या उन्हाळ्याची सुट्टी, लग्नसराई आणि लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने परप्रांतीय मुंबईतून आपापल्या राज्यात जात आहेत. सध्या उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड असून सर्वसाधारण तिकीट काढून प्रवासी आरक्षित डब्यांमध्ये गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे तीन महिने आधी तिकिटाचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना प्रवासादरम्यान त्रास सोसावा लागत आहे.
देशात दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून, तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होत आहे. त्यामुळे आजही मोठ्या संख्येने नागरिक उत्तर भारतात जात आहेत. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या सुट्ट्या, लग्न समारंभ आणि महत्त्वाच्या कार्यक्रमानिमित्त मुंबईतून उत्तर भारतात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दररोज अनेक रेल्वेगाड्यांमधून लाखोंच्या संख्येने प्रवासी उत्तर भारतातील आपल्या गावी जात आहेत. आरामदायी प्रवास व्हावा यासाठी अनेक जण आरक्षित तिकीट काढतात. मात्र, आरक्षित तिकीट मिळूनही अनेक प्रवाशांचा प्रवास त्रासदायक होत आहे. आरक्षित तिकीट नसलेले प्रवासी, प्रतीक्षा यादीतील प्रवासी रेल्वेगाड्यांमध्ये शिरत असून रेल्वेडब्यात जिथे जागा मिळेल तिथे हे प्रवासी बसत आहेत. त्यामुळे तिकीटाचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
हेही वाचा – रवी किशन यांच्या डीएनए चाचणीची मागणी न्यायालयाने फेटाळली
मध्य रेल्वेवरून उत्तर प्रदेशात दैनंदिन सुमारे २२ ते २५ आणि बिहारमध्ये १० नियमित रेल्वेगाड्या जातात. तर, दररोज उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ५ते ७ विशेष रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे दिवसाला साधारणपणे ४० रेल्वेगाड्या तेथे असून, गेल्या २५ दिवसात सुमारे एक हजार रेल्वेगाड्या धावल्या आहेत.
गेल्या २५ दिवसांत पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातून सुमारे २३ ते २५ रेल्वेगाड्या उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गेल्या आहेत. तर नियमित २० रेल्वेगाड्या मुंबईतून उत्तर भारतात जातात.
मुंबईतून उत्तर प्रदेश, बिहारसाठी एप्रिल महिन्यात दररोज सुमारे ४० ते ४५ रेल्वेगाड्या धावल्या असून, यामधून सुमारे २ ते ३ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर, १ ते २५ एप्रिल या कालावधीत एक हजारांहून अधिक नियमित आणि विशेष रेल्वेगाड्या धावल्या असून यामधून सुमारे ५० लाख प्रवाशांनी प्रवास केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा – अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : कुख्यात अनमोल बिष्णोईविरोधात लुक आऊट सर्कुलर जारी
एका रेल्वेगाडीची क्षमता साधारण १,७०० ते २ हजार प्रवासी इतकी आहे. मात्र, आजघडीला एका रेल्वेगाडीतून सुमारे पाच हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे साधारणपणे ४० टक्क्यांपेक्षा जास्त गर्दी रेल्वेगाड्यांमध्ये होत आहे.
उत्तर भारतात जाणाऱ्या नियमित, विशेष रेल्वेगाड्यांना कायम गर्दी असते. मात्र अद्यापपर्यंत रेल्वे प्रशासनाला योग्य नियोजन करता न आल्याने प्रवाशांची गैरसोय होते. विशेष रेल्वेगाडीची माहिती प्रवाशांपर्यंत उशिरा पोहचते. त्यामुळे तिकीट दलालांचा फायदा होतो. तसेच पूर्वी अनारक्षित रेल्वेगाड्या जास्त धावत होत्या. मात्र, आता वातानुकूलित डब्यांची संख्या अधिक आहे. – सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद