मुंबई : मुंबई – नवी मुंबई अंतर २० ते २२ मिनिटांत पार करता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या मुंबई पारबंदर प्रकल्पाचे (शिवडी – न्हावशेवा सागरी सेतू) लोकार्पण २५ डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपाने सोमवारी ट्विटरच्या माध्यमातून केली. मात्र या सागरी सेतूचे काम डिसेंबरअखेरीस पूर्ण होईल. त्यामुळे सागरी सेतू डिसेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता नसल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. यामुळे या प्रकल्पाच्या लोकार्पणाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
नवी मुंबई आणि मुंबईला जोडण्यासाठी, तसेच दोन्ही शहरांमधील अंतर २० ते २२ मिनिटांत पार करता यावे यासाठी एमएमआरडीए २१.८० किमी लांबीच्या शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतूची उभारणी करीत आहे. या प्रकल्पाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. हे काम सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र करोना आणि इतर अडचणींमुळे या कालावधीत प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. आता मात्र डिसेंबर २०२३ पर्यंत हा सागरी सेतू पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने कामाला वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत या सागरी सेतूचे ९६ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. एमएमआरडीएच्या मुहूर्तानुसार डिसेंबरपासून हा सागरी सेतू वाहतूक सेवेत दाखल होईल का असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. असे असताना भाजपाने मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या लोकार्पणाची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र भाजपाने ट्विटरवर एक ध्वनीचित्रफितीद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणखी एक स्वप्न पूर्ण होणार असून २५ डिसेंबर रोजी मुंबई पारबंदर प्रकल्पाचे लोकार्पण होईल असे जाहीर केले आहे.
भाजपाच्या या घोषणेनंतर एमएमआरडीएतील अधिकारी या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहेत. दरम्यान, या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबरअखेरीस प्रकल्पाचे संपूर्ण काम पूर्ण होईल, असे सूत्रांकडून सांगितले. जानेवारीत प्रकल्प प्रत्यक्ष वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. एकीकडे भाजपाने २५ डिसेंबर रोजी लोकार्पणाची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे एमएमआरडीएने याबाबत नकार दिला आहे. त्यामुळे नागरिक मात्र संभ्रमात पडण्याची शक्यता आहे.