मुंबईः ‘हायजॅक का सारा प्लानिंग हो चुका हैं’ असा संवाद मोबाइलवर साधणाऱ्या प्रवाशामुळे गुरूवारी मुंबई विमानतळावरून उड्डाण करण्याच्या बेतात असलेल्या विमानात एकच खळबळ उडाली. अखेर याप्रकरणी तक्रार करण्यात आल्यानंतर सहार पोलिसांनी संबंधित प्रवाशाला अटक केली. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या खासगी कंपनीच्या विमानात एक प्रवासी मोबाइलवरून संशयास्पद संवाद साधत होता. त्यामुळे विमानात एकच खळबळ उडाली.
हेही वाचा >>> मुंबई: प्रेमसंबंधाचा संशय घेणाऱ्या पतीची हत्या
याप्रकरणी विमान कंपनीत काम करणाऱ्या नेहा सोनी यांच्या तक्रारीवरून सहार पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रवासी रितेश जुनेजा (२३) याला अटक केली. सोनी या विमानामध्ये बसणाऱ्या प्रवशांना मदत करीत होत्या. त्यावेळी २७ क्रमांकाच्या आसनावर बसलेली एक व्यक्ती मोबाइलवर जोरजोरात बोलत होती. ‘अहमदाबादचे विमान सुटण्याच्या तयारीत आहे. काही अडचण असेल, तर मला दूरध्वनी करा. विमानाच्या अपहरणाची योजना आहे. त्याची चिंता करू नये’, असे हा प्रवासी बोलत असल्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सोनी यांनी याबाबत तपासणी केली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी निष्काळजीपणाचे कृत्य करणे, सार्वजनिक आगळीक निर्माण होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी जुनेजाला अटक केली. चौकशीत त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे समजले.