मुंबई : बेस्ट उपक्रमात अपघाताची मालिका सुरूच असल्याने बेस्ट प्रवाशांचा प्रवास धोकादायक बनू लागला आहे. बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वावरील बसगाडीला शुक्रवारी आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. बेस्ट उपक्रमाच्या पेट्रोल पंपाजवळ ही आग लागली. अग्निशमन दलाचे जवान वेळीच घटनास्थळी पोहचल्याने आग आटोक्यात आली. अन्यथा पेट्रोल पंपाला आग लागून मोठी दुर्घटना घडली असती.
बेस्ट उपक्रमाच्या ओशिवरा आगारात शुक्रवारी दुपारी कंत्राटदार मेसर्स हंसा यांच्या मालकीच्या १० ते १२ बस उभ्या होत्या. यापैकी बंद पडलेल्या एका बसची दुरुस्ती करण्यात येत होती. यावेळी बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बसने पेट घेतला. घटनेची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला देण्यात आील. अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बसला लागलेली आग विझविली. परंतु, या आगीत बस जळून गेली. दुर्घटनाग्रस्त बसजवळच पेट्रोल पंप होते. सुदैवाने आदीत पेट्रोल पंपाचेही नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्याने आग पसरली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.